कर्नाटकातील गुटखा गोवामार्गे कोकणात: अनेक कंपन्या बनावट 

Large scale smuggling of Gutkha from Karnataka to Maharashtra
Large scale smuggling of Gutkha from Karnataka to Maharashtra

चिपळूण : महाराष्ट्रात गुटखाबंदी होऊन आठ वर्षे झाली; मात्र कर्नाटकातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होत आहे. कर्नाटकातील गुटखा गोवामार्गे कोकणात येत आहे. छोट्या-मोठ्या वाहनांबरोबर कंटेनरमधून गुटख्याची तस्करी होत असून त्याला काहींचा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. 


चिपळुणातील नागरिकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने २६ लाखाच्या गुटख्याची तस्करी उघड केली. या प्रकरणी चिपळुणातील मुश्‍ताक कच्छी आणि सिंधुदुर्गातील दोन वाहनचालकांना अटक केली होती. कच्छी हा सिंधुदुर्गातील भूषण शिरसाट या व्यक्तीकडून गुटखा विकत घ्यायचा, हे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली. शिरसाट हा कर्नाटकमधून गुटखा विकत आणायचा, असे त्याने पोलिसांना सांगितले. 


२०१२ मध्ये गुटखाबंदी केली पण प्रभावी अंमलबजावणीअभावी राजरोस खुलेआम गुटख्याची विक्री होत आहे. बंदीमुळे अधिकृत गुटख्याच्या ब्रॅंडनी राज्यातील कारखाने बंद केले तर काहींनी गुजरात व कर्नाटकात कारखाने हलवले. चिपळूणसह जिल्ह्यात काही ठिकाणी अनधिकृत कारखाने सुरू झालेत. त्याशिवाय कर्नाटकातील गुटखा गोवामार्गे रत्नागिरी व सिंधुदुर्गात आणला जात आहे. गुटखा तयार करणारे कारखानदार, वितरक, विक्रेते यांनी समांतर यंत्रणा उभी केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून छोट्या, मोठ्या वाहनांतून गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. २६ लाखाचा गुटखा चिपळूणपर्यंत आला. त्याची माहिती संबंधित खात्याला मिळाली नाही.

एक नजर
 गुटख्याच्या अनेक कंपन्या बनावट 
 ५० पैसे किमतीच्या गुटख्याची सात रुपयांनी विक्री
 ब्रॅंडेड कंपन्यांच्या गुटख्याची किंमत १५ ते २५ रुपये 
 कर्नाटकातून गोवामार्गे आलेला गुटखा कोकणात वितरित 
 रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुटख्याचे गोडाऊन
 काही व्यापाऱ्यांनीही उभी केली विक्रीची समांतर यंत्रणा

गुटखाबंदीच्या अंमलबजावणीस अन्न व औषध प्रशासनाबरोबर पोलिसांना अधिकार दिले होते; तसेच शाळा, कॉलेजच्या आवारात होणाऱ्या गुटखा विक्रीवर कारवाईचे अधिकार मुख्याध्यापक व प्राचार्यांना दिले आहेत; पण गुटखा विक्रीवर कारवाईचे धाडस दाखवलेले नाही.
- शौकत मुकादम, सामाजिक कार्यकर्ते, चिपळूण

संपादन- अर्चना बनगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com