
जिल्ह्यामध्ये पाच लसीकरण केंद्र मंजूर झाले असून त्यामध्ये राजापूर ग्रामीण रूग्णालयाचा समावेश आहे
राजापूर: “ राजापूर ग्रामीण रूग्णालयात लसीकरण सेंटर मंजूर झाल्याबद्दल तसेच कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय अधिकारी डॉ. राम मेस्त्री आणि सर्व सहकार्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.” असे गौरवोद्गार माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी लसीकरण केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी काढले. यावेळी त्यांनी प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
देशभरात पसरलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडीयाने लस तयार केली आहे. त्याचे लसिकरण करण्याला शुभारंभ झाला आहे. त्यासाठी जिल्ह्यामध्ये पाच लसीकरण केंद्र मंजूर झाले असून त्यामध्ये राजापूर ग्रामीण रूग्णालयाचा समावेश आहे. कोविड 19 संसर्ग प्रतिबंध लसीकरण कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या राजापूर ग्रामीण रूग्णालयातील लसीकरण केंद्राचा शुभारंभ आज (ता.16) झाला. यावेळी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, नायब तहसिलदार अशोक शेळके, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम मेस्त्री, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, नोडल ऑफिसर डॉ सतीश पाटील, नरसेवक गोविंद चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. मेस्त्री या लसीकरण मोहिमेसंबंधित सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका यांना ही लस देण्यात येणार असून अठरा वर्षाखालील मुले, गरोदर स्त्रिया, मधुमेह, रक्तदाब असलेल्या रूग्णांना या लसीकरणापासून वगळण्यात येणार असल्याचे डॉ. मेस्त्री यांनी सांगितले. ज्या व्यक्तीला लसीकरण करण्यात येणार आहे त्या व्यक्तीला लसीकरणानंतर काही काळ वैद्यकीय निगरानीखाली ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लसीकरणासाठी रूग्णालयामध्ये करण्यात आलेल्या नियोजनाची सविस्तर माहितीही त्यांनी यावेळी दिली. कोरोना संसर्गाला तालुक्यामध्ये रोखण्यामध्ये सार्यांचेच एकत्रित प्रयत्न उपयुक्त ठरले असून त्याबद्दल डॉ. मेस्त्री यांनी सार्यांना धन्यवादही दिले. यावेळी नगराध्यक्ष अॅड. खलिफे, पोलिस निरिक्षक श्री. परबकर यांनी मनोगत व्यक्त करताना सार्यांना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.
संपादन- अर्चना बनगे