सत्ताधारी दिशाभूल करत आहेत ; भाजप उचलणार आता कायदेशीर पावले

legal action made by a BJP on the topic land business confidential in ratnagiri
legal action made by a BJP on the topic land business confidential in ratnagiri

रत्नागिरी : आलीमवाडीतील पाणी टाकीसाठी चार गुंठे जागा जादा दराने खरेदी केली जात आहे. यात जनतेचा पैसा फुकट जाणार आहे. त्या विरोधात भाजप कायदेशीर पावले उचलेल. सत्ताधारी दिशाभूल करत आहेत. महामार्गाच्या कायद्याप्रमाणे जमीन संपादनासाठी मोबदल्याची तरतूद करणे चुकीचे असून हा व्यवहार संशयास्पद आहे.

सर्वसाधारण सभेत दर निश्‍चितीवर फेरविचार करावा आणि रेडीरेकनरनुसार तडजोडीने दर ठरवण्यासाठी फेर प्रस्ताव करा, असे आवाहन भाजपच्या विधी आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परुळेकर यांनी केले. येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाणी योजनेचा आराखडा जीवन प्राधिकरणाने केला आहे. त्यात किल्ला, परटवणेमध्ये टाकी बांधण्यासाठी दोन जागा निश्‍चित केल्या. त्या मोफत मिळणार होत्या. तरीही आलीमवाडीतील जागा जादा दराने घेण्यासाठीचा ठराव जिल्हा प्रशासनाकडे पाठवला.

त्रिसदस्यीय समितीने १ कोटी २४ लाख रुपयांचा दर निश्‍चित केला. तीच जागा वर्षभरापूर्वी १७ लाख रुपयांनी घेतली होती. त्यामुळे हलगर्जीपणा किंवा भ्रष्टाचाराचा संशय येतो. पुन्हा तो प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्याचे अधिकार सभेला आहेत. गुरुवारी (ता. २६) सभेत निर्णय घ्या. सत्ताधाऱ्यांनी सार्वजनिक पैसा फुकट घालवू नका, असा सल्ला ॲड. परुळेकर यांनी दिला.

महामार्गाच्या भूसंपादनासाठीचा कायद्याचा फेरविचार केला पाहिजे. त्यातील अर्जन्सी क्‍लॉजखाली जमिनीच्या किंमती ठरवल्या गेल्या. किंमत वाढवण्यासाठी कायद्याचा आधार घेतला, मात्र कार्यपद्धती अवलंबलेली नाही. ही प्रकियाच बेकायदेशीर आहे. सीआरझेडचा बागुलबुवा सत्ताधाऱ्यांनी उभा केला. अन्य नगरसेवकांना अंधारत ठेवले. त्यामुळे फौजदारीही दाखल होऊ शकते. त्या जमिनीचा रेडीरेकनरचा दर ६ लाख २४ हजार रुपये असताना सध्या आकारलेला दर भरमसाट आहे.

त्याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन ॲड. परुळेकर यांनी केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, ॲड. विजय साखळकर, ॲड. अशोक कदम, ॲड. महेंद्र मांडवकर, सचिन करमरकर, समीर तिवरेकर, मुन्ना चवंडे, राजू तोडणकर, अन्य उपस्थित होते.

चांगल्या लोकांनी काम करणे पसंत नसावे

माझ्यासारख्या चांगल्या लोकांनी राजकारणात काम करणे नगराध्यक्षांना पसंत नाही, हे त्यांच्या वक्‍तव्यावरून दिसते, असा टोला मारून ॲड. पटवर्धन म्हणाले, नगराध्यक्षांच्या मित्रत्वाच्या सल्ल्याचा विचार योग्यवेळी करेन.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com