गाय का ओरडते म्हणून धाव घेतली आणि बिबट्याने गायीची पकड सोडली

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

गेल्या चार दिवसांतला बिबट्याने भरदिवसा केलेला हा दुसरा हल्ला आहे. 

पावस (रत्नागिरी) : रत्नागिरी तालुक्‍यातील पावस भाटीवाडी येथे सकाळी नऊला बिबट्याने हल्ला केल्याने गाय गंभीर जखमी झाली आहे. येथील रघुनाथ मुरकर यांची जनावरे चरण्यासाठी कळपाने गेली होती. त्या वेळी बिबट्याने गायीवर हल्ला केला. गेल्या चार दिवसांतला बिबट्याने भरदिवसा केलेला हा दुसरा हल्ला आहे. 

पावस, नाखरे, मेर्वी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, माणसांपाठोपाठ पाळीव जनावरांवर हल्ला करून पुन्हा एकदा नव्याने दहशत निर्माण केली आहे. आज सकाळी रघुनाथ मुरकर यांची गाय घरापासून जवळ असलेल्या नेहमीच्या ठिकाणी चरण्यासाठी गेली. शेजारी कळपाने गुरे चरत होती. त्यातील गायीवर हल्ला केल्याने जनावरे मोठमोठ्याने ओरडू लागली. त्यामुळे काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात येतात.

तेथे जवळच कापणी करणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने धाव घेत्‌ आरडोरड केल्याने बिबट्याने आपली पकड सोडली आणि तो पळून गेला. त्या गायीला मोठ्या प्रमाणात ओरखडे काढल्यामुळे ती जखमी झाली. तिच्यावर तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यानी उपचार केले. गायीने भीतीने खाणे, पिणे बंद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

यापूर्वी मेर्वी येथे दोनदा, नाखरे येथे दोनदा व पावस कुंभार घाटी येथे एकदा असा याआधी बिबट्याने पाच वेळा हल्ला केल्यावर आज सहावा हल्ला करून पुन्हा एकदा वन विभागाला जणू आव्हान दिले आहे. पावस परिसरात गेला दीड महिना वन विभागाचे बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजूनही यश येत नसल्याने माणसांच्या व पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard attack on cow in ratnagiri morning in 9pm cow injured badly