बिबट्या धावला शेतकऱ्याच्या अंगावर अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard Attack On Farmer In Sangmeshwar Taluka Ratnagiri Marathi News

सुरेश जुवळे हे गेली 20 वर्षे शेळीपालनाचा व्यवसाय करत आहेत. नेहमीप्रमाणे ते आपल्या 22 बकऱ्या घेऊन रानमाळावर गेले होते. दरम्यान एक बोकड ओरडल्याचा त्यांना आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने त्यांनी धाव घेतली

बिबट्या धावला शेतकऱ्याच्या अंगावर अन्...

संगमेश्‍वर (रत्नागिरी) - संगमेश्‍वर तालुक्‍यातील आंबव पोंक्षे गावातील शेतकरी सुरेश बाळू जुवळे यांच्या तीन बकऱ्या बिबट्याने ठार मारल्या. बिबट्याच्या मुक्‍त संचाराने गावात भीतीचे वातावरण असून वनविभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. 

सुरेश जुवळे हे गेली 20 वर्षे शेळीपालनाचा व्यवसाय करत आहेत. नेहमीप्रमाणे ते आपल्या 22 बकऱ्या घेऊन रानमाळावर गेले होते. दरम्यान एक बोकड ओरडल्याचा त्यांना आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने त्यांनी धाव घेतली. समोर घडलेला प्रकार पाहून जुवळे यांना धक्‍काच बसला. बिबट्याने त्यांच्या एका बोकडाला ठार मारले होते आणि दुसऱ्या बोकडाला तोंडात पकडले होते. या वेळी जुवळे यांनी हातातील काठीने बिबट्याला पिटाळण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्या अंगावर धावून आल्याने जुवळे यांनी स्वतःच्या बचावासाठी दरीतील झुडपावर उडी घेतली. त्यांच्या पायाला दुखापत झाली. या घटनेतून थोडे सावरत त्यांनी आपल्याजवळील मोबाईलवरुन घरी फोन लावला. घडल्या घटनेची कल्पना दिली. घटनास्थळी पोचल्यानंतर नातेवाईकांनी प्रथम जुवळे यांना दवाखान्यात हलविले. काहींनी बकऱ्यांचा शोध घेतला. या वेळी तीन बकऱ्या कमी असल्याचे दिसून आले. 

सुरेश जुवळे यांचा 2001 मध्ये रिक्षा अपघातात कंबरेला मार बसल्याने त्यांना शेती करणे अशक्‍य झाल्याने त्यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला. शासनाचे कोणतेही अनुदान न घेता त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. महिन्याभरापूर्वी बिबट्याने सुरेश जुवळे यांची गाभण गायही मारली होती, तर जानू कदम यांचा बैल मारला होता. सुरेश जुवळे यांच्या बकऱ्या मारण्याची ही तिसरी वेळ आहे. 

या घटनेबाबत वनाधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता मृत बकऱ्या किंवा त्यांचे अवशेष सापडत नाहीत, तोवर शासनाकडे नुकसान भरपाईचा प्रस्ताव पाठवता येणार नाही असे सांगितले.