देवरूख नजीक ओझरेखुर्दमध्ये पाड्यावर बिबट्याचा हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

गावातील प्रदीप जागुष्टे यांचा दुग्ध व्यवसाय आहे. शनिवारी संध्याकाळी त्यांचे दोन पाडे चरायला सोडण्यात आले होते. हे दोन्ही पाडे वाडीतील संतोष जागुष्टे यांच्या अंगणात रविवारी पहाटेपर्यंत बसलेले होते. पहाटे पाचच्या सुमारास रानातून एक बिबट्या आला व या दोन पाड्यांमधील तीन वर्षाच्या एका पाड्यावर त्याने हल्ला चढविला.

देवरूख - नजीकच्या ओझरेखुर्द येथे तीन वर्षाच्या पाड्यावर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची घटना नुकतीच घडली. बिबट्याचा भर वस्तीतील वावरामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.  गावातील प्रदीप जागुष्टे यांचा दुग्ध व्यवसाय आहे. शनिवारी संध्याकाळी त्यांचे दोन पाडे चरायला सोडण्यात आले होते. हे दोन्ही पाडे वाडीतील संतोष जागुष्टे यांच्या अंगणात रविवारी पहाटेपर्यंत बसलेले होते. पहाटे पाचच्या सुमारास रानातून एक बिबट्या आला व या दोन पाड्यांमधील तीन वर्षाच्या एका पाड्यावर त्याने हल्ला चढविला.

बिबट्याने त्याला ठार मारत ताव मारला. हा प्रकार दुसऱ्या पाड्याने पाहिल्यावर तो ओरडत गोठ्याजवळ आला. गाय व पाडा ओरडत असल्यामुळे मालक प्रदीप जागुष्टेना जाग आली. जागुष्टे यांना पाहिल्यावर बिबट्याने तेथून पळ काढला. हा काहीतरी विचित्र प्रकार असल्यामुळे जागुष्टे देखील त्याच्यामागून धावू लागले. 

आरडाओरड ऐकल्यावर नजीकच असलेल्या रानात बिबट्याने त्या पाड्याला अर्धे खाऊन धूम ठोकली. जागुष्टे यांनी हा प्रकार पाहून ग्रामस्थांना जागे केले.गावचे पोलिस पाटील सुधीर जागुष्टे यांनी या घटनेची माहिती घेतली. प्रत्यक्ष पाहणी देखील केली. बिबट्याने भरवस्तीत हल्ला केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दोन वर्षांनी पुन्हा हल्ला 
दोन वर्षांपूर्वीच जागुष्टे यांच्याच गाईवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यावेळी वनविभागाला निवेदन देखील देण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा बिबट्याने जागुष्टे यांच्या पाड्यावर हल्ला चढवून त्याला ठार केले. या घटनेचा पंचनामा रविवारी करण्यात आला. याची खबर वन विभागाला देण्यात आली.या बिबट्याचा वनविभागाने वेळीच बंदोबस्त करावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard attack in OzhareKhurd near Devrukh