कोकण रेल्वेच्या समोर बिबट्या आला अन्... 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना संगमेश्वर तालुक्‍यातील परचुरी येथील रेल्वे ब्रिजवर आला. ब्रिज ओलांडत असताना अचानक हॉलिडे स्पेशल करमाळी एलटीटी एक्‍सप्रेस कोकण रेल्वे मार्गावरून आली.

रत्नागिरी - कोकण रेल्वेच्या धडकेत बिबट्या ठार झाला. काल (ता. 23) संगमेश्‍वर तालुक्‍यातील परचुरी पुलावर ही घटना घडली. धडकेमध्ये बिबट्याचा मागचा पाय आणि शेपटी तुटून गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे 8 मिनिटे रेल्वे थांबली. वन विभागाने मृत बिबट्याला ताब्यात घेतला. शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. 

बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना संगमेश्वर तालुक्‍यातील परचुरी येथील रेल्वे ब्रिजवर आला. ब्रिज ओलांडत असताना अचानक हॉलिडे स्पेशल करमाळी एलटीटी एक्‍सप्रेस कोकण रेल्वे मार्गावरून आली. त्या भरधाव रेल्वेची धडक बिबट्याला बसली. या अपघातात बिबट्याचा मागचा एक पाय आणि शेपुट तुटली. तसेच चेहऱ्यालाही मार बसला.

रात्री सव्वा नऊ वाजण्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान रेल्वेची धडक बिबट्याला लागल्याचे रेल्वे गार्डच्या लक्षात आले. त्याने रेल्वे थांबविण्याचा इशारा दिला. पुढे जाऊन रेल्वे थांबली. जवळपास 8 मिनिटे ही रेल्वे थांबली. ट्रॅकमन कळंबटे आणि सुपरवायझर पुंडलिक किनरे हे देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र जखमी बिबट्या गतप्राण झाला. याची माहीती संगमेश्वर रेल्वे स्टेशनला देण्यात आली. त्यानंतर वन विभागालाही याची माहिती दिली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि मृत बिबट्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर वनविभागाने या मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार केले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Death In Rail Accident Ratnagiri Marathi News