भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या विसावला गोठ्यात अन्...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

लांजा तालुक्‍यातील कोंडये बौद्धवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून मादी बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. दिवसाढवळ्या ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन होत आहे.आज पुन्हा तसेच घडले.

लांजा ( रत्नागिरी ) - भक्ष्याच्या शोधार्थ मानवी वस्तीत आलेल्या बिबट्याने दोनवेळा दर्शन दिले. कोंडये बौद्धवाडी येथे काही काळ तो गुरांच्या गोठ्यात विसावला. मात्र घरातील महिलेने त्याला पाहताच भीतीने आरडाओरडा केला. तेव्हा लोक जमले. माणसांची चाहूल लागताच बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली.सकाळी 11. 30 वाजण्याच्या सुमारास तसेच दुपारी 2 वाजता बिबट्या वाड्याकडे आला होता. मंगळवारी घडलेल्या या घटनेने कोंडये बौद्धवाडी येथील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. 

लांजा तालुक्‍यातील कोंडये बौद्धवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून मादी बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. दिवसाढवळ्या ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन होत आहे.आज पुन्हा तसेच घडले.  बौद्धवाडी येथे अनंत कांबळे यांचे घर असून पाठीमागे मोठे जंगल आहे. कांबळे यांचे कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्यास असतात. मात्र अधूनमधून ते गावी येतात. इतर वेळी घर बंद असते.

हेही वाचा - काय सांगता ! यंदा हापूस जाणार अर्जेंटिनाला 

घराशेजारी त्यांचा गुरांचा गोठा आहे. या गोठ्यात कुत्रीची नवजात पिल्ले होती. कांबळे कुटुंबीय सध्या गावी आले आहे. आज मंगळवारी सकाळी 11. 30 वाजण्याच्या सुमारास कांबळे यांच्या सूनबाई वृषाली गणेश कांबळे यांना गोठ्यात बिबट्या दिसला होता. माणसाची चाहूल लागताच तो निघून गेला. पुन्हा दुपारी 2 वाजता या बिबट्याने गोठ्याकडे मोर्चा वळवला. गोठ्यात बसलेल्या बिबट्याला पाहताच कांबळे यांच्या घरातील महिलांनी आरडाओरडा केला आणि बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली.बिबट्या गोठ्यात असल्याची माहिती मिळाल्यावर वनपाल अशोक सांडव सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. 

हेही वाचा - मुंबई गोवा महामार्गावर का लावता येणार नाही टोल ? 

मादी सोबत बछडाही

कोंडये बौद्धवाडी येथील हा बिबट्या जखमी आहे. ज्या वेळी तो गोठ्यातून बाहेर पडला तेव्हा तेथील भिंतीवरून उडी मारताना तो पडला होता.बिबट्याची ही मादी पूर्ण वाढ झालेली आहे. ती 5 ते 6 वर्षे वयाची असल्याचे वनपाल सांडव यांनी सांगितले. त्याच्या सोबत एक बछडा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

बाैद्धवाडीत बिबट्याचा मुक्त संचार

बौद्धवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. यासाठी येथे पिंजरा लावला जाणार असल्याचे वनपाल सांडव यांनी सांगितले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Took Rest In Cattle Shelter In Search Of Food Ratnagiri Marathi News