बिबट्याची झलक कॅमेऱ्यात कैद 

प्रभाकर धुरी
Sunday, 29 November 2020

जंगल भागातून प्रवास करताना एखादा वन्यप्राणी अचानक समोर ठाकला तर भल्याभल्यांची भंबेरी उडते. दोडामार्ग तालुका तर वन्यप्राण्यांचे माहेरघरच. इथे सर्व प्रकारचे वन्यप्राणी सहजपणे नजरेस पडतात.

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - हत्ती, वाघ, गवे आणि ब्लॅंक पॅंथरचा वावर असलेल्या मोर्ले-घोटगेवाडी मार्गावर गावकऱ्यांना रात्रीच्या वेळी बिबट्या दिसल्यामुळे सर्व परिसर जैवसमृद्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. वन्य प्राण्यांच्या सततच्या सहवासाला सरावलेल्या गावकऱ्यांनी न घाबरता त्या बिबट्याला कॅमेऱ्यात कैद केले. 

जंगल भागातून प्रवास करताना एखादा वन्यप्राणी अचानक समोर ठाकला तर भल्याभल्यांची भंबेरी उडते. दोडामार्ग तालुका तर वन्यप्राण्यांचे माहेरघरच. इथे सर्व प्रकारचे वन्यप्राणी सहजपणे नजरेस पडतात. दिवस बुडाला की तुमच्या वाटेत कधी हत्ती, वाघ, बिबट्या, गवा किंवा एखादे गलेलठ्ठ सांबर आडवे येईल हे सांगणे कठीण. असाच एक बिबट्या दोन दिवसांपुर्वी मोर्ले-घोटगेवाडी मार्गावरील मोर्लेबाग तिठ्याजवळ आबा राऊळ यांच्या दृष्टीस पडला. ते आणि त्यांचे मित्र रात्री दहाच्या दरम्यान मोर्ले ते घोटगेवाडीला जात असताना मोर्लेबाग तिठ्याच्या जरा पुढे गाडीच्या उजेडात त्यांना बिबट्या दिसला. ऐटदार देखणा बिबट्या पाहून ते थांबले आणि रस्त्यावरून रमत गमत बाजूच्या झाडीमध्ये गेलेल्या त्या बिबट्याची मोहक अदा त्यांनी धाडसाने कॅमेऱ्यात कैद केली. 

बिबट्या, वाघ, ब्लॅंक पॅंथरही 
काही दिवसांपुर्वी संतोष मोर्ये आणि कांता गवस यांनी घोटगेवाडीतील दाळोबा देवस्थानाजवळ वाघाचा बछडा पाहिला होता. तेथेच रस्त्यालगतच्या मोरीवर बसून लांडोरीवर झडप घालू पाहणारा ब्लॅंक पॅंथरही गावकऱ्यांना दिसला होता. वनविभाग काहीही सांगू देत, त्या परिसरात सर्व प्रकारच्या वन्यप्राण्यांचा वावर आहे हे नाकारून चालणार नाही, अशी प्रतिक्रीया स्थानिकांनी दिली. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopards were spotted in Morle-Ghotgewadi area of ​​Sindhudurg district