तीन दिवसाच्या विश्रांती नंतर हल्ला करण्यास बिबट्याने केली पुन्हा सुरुवात

सुधीर विश्‍वासराव
Thursday, 5 November 2020

पावसवासियांची पाठ बिबट्या सोडेना

एकाच दिवशी दोन जनावरांवर हल्ला ; बकरी ठार, पाडा जखमी

पावस (रत्नागिरी) : रत्नागिरी तालुक्यातील पावस पंचक्रोशीत बिबट्याचे प्राण्यांवरील हल्ले वाढत चालले आहेत. एक बिबट्या जेरबंद झाल्यानंतर दुसर्‍या बिबट्याने प्राण्यांवर हल्ले करण्यास सुरवात केली आहे. नाखरे-खाबडवाडी येथील जयवंत जाधव यांच्या बकरीवर बिबट्याने दुपारी हल्ला करून ठार केले असून सायंकाळी मावळंगे येथील रमेश बाळकृष्ण शिंदे यांच्या घराजवळ असलेल्या गोठ्यातील पाड्यावर हल्ला करून जखमी केले आहे.

बिबट्याने एकाच दिवशी दोन ठिकाणी हल्ले केल्याने पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मेर्वी येथील तीन पाळीव जनावरांवर हल्ला केल्यानंतर बिबट्याने तीन दिवस विश्रांती घेतली होती. मात्र 4 नोव्हेंबरला दुपारी नाखरे खांबडवाडी येथील जयवंत जाधव यांची बकरी चरण्यासाठी गेली असता दुपारी बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला ठार केले. यापूर्वी या भागात बकरीवर हल्ला झाला होता. परंतु जाधव यांच्या दक्षतेमुळे ही बकरी वाचली होती. परंतु या वेळी बिबट्याने हल्ला करून बकरीला ठार केले. याबाबत माजी सरपंच विजय चव्हाण यांनी वनविभागाला कळवले.

वनपाल गौतम कांबळे, वनरक्षक मिताली कुबल यांनी घटनेचा पंचनामा केला. मात्र सायंकाळी याच परिसरात काही अंतरावर रमेश बाळकृष्ण शिंदे घराजवळ असलेल्या गोठ्यातील गाईचे दूध काढून निवांत बसले होते. सायंकाळी साडेसात ते पावणेआठ दरम्यान विचित्र वास आल्याने त्यांनी गोठ्याकडे धाव घेतली असता बिबट्याने गोठ्यामध्ये असलेल्या तीन जनावरांपैकी एकावर हल्ला करून जखमी केल्याचे दिसून आले. तातडीने बॅटरी व काठीच्या साह्याने त्यांनी बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा- जिताने की जिम्मेदारी मेरी रहेगी -

बॅटरीचा फोकस मारून मोठ्याने आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. सायंकाळी हल्ला केल्याने रात्री बिबट्या पुन्हा येईल, या शक्यतेने शिंदे यांनी रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत पाळत ठेवली होती. खबरदारी म्हणून त्यांनी अन्य जनावरांना सुरक्षित ठेवले होते. मात्र बिबट्याच्या वावरामुळे पाळीव प्राण्यांना चरण्यास सोडणे धोकादायक झाले आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lepard begun to attack animals ratnagiri