तुतारी एक्स्प्रेसला कमी पण लांब पल्ल्याच्या गाड्यांना क्षमतेपेक्षा जास्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

मागणीनुसार दादर-सावंतवाडी तुतारी एक्‍स्प्रेस विशेष गाडी 26 पासून सुरू केली; मात्र गेल्या पाच दिवसात त्याला कमी प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी मुंबईहून 33 टक्‍के तर परतीच्या प्रवासात 59 टक्‍के तिकिटे आरक्षण आहे.

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर चार विशेष गाड्या सोडल्या आहेत; मात्र कोविडचा परिणाम या गाड्यांवर दिसत आहे. गेल्या पाच दिवसात तुतारी एक्‍स्प्रेसमधून 30 ते 45 टक्‍केच प्रवासी प्रवास करताहेत. मोठी प्रवासी क्षमता असलेल्या या गाडीला कमी प्रतिसाद मिळत असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड कोरेला बसणार आहे. तुलनेत निजामुद्‌दीन, एर्नाकुलम, नेत्रावती एक्‍स्प्रेसला क्षमतेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत आहे. 

लाखो कोकणी मुंबईत वास्तव्य करत आहेत. कोरोनामुळे ही मंडळी गावाकडे परतली आहेत. कोरोनाचे सावट कमी होऊ लागल्यानंतर काहींनी पुन्हा मुंबई गाठली आहे; परंतु अनेकजण वाहतूक व्यवस्था नसल्याने गावी राहिले आहेत. एसटीपाठोपाठ कोकण रेल्वेनेही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक ते तिरुवअनंतपुरम (06345/46), एर्नाकुलम एक्‍स्प्रेस (02618/17), दादर-सावंतवाडी तुतारी एक्‍स्प्रेस (01003/04), बेंगळुरू सिटी (06585/86) या चार गाड्या धावत आहेत. यामध्येही एका दिवसात जाऊन येण्यासाठी वेगवान गाड्या हव्यात.

मागणीनुसार दादर-सावंतवाडी तुतारी एक्‍स्प्रेस विशेष गाडी 26 पासून सुरू केली; मात्र गेल्या पाच दिवसात त्याला कमी प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी मुंबईहून 33 टक्‍के तर परतीच्या प्रवासात 59 टक्‍के तिकिटे आरक्षण आहे. लोकमान्य टिळक एक्‍स्प्रेसला 24 सप्टेंबरपासून सरासरी 70 टक्‍के तिकिटांचे आरक्षण होते. कारवार एक्‍स्प्रेसला सरासरी 15 ते 17 टक्‍के तिकीटे आरक्षित केली होती. 

कारवार एक्स्प्रेसला अत्यल्प प्रतिसाद 
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तुतारी एक्‍स्प्रेसला पुढील चार दिवसातील आरक्षणातही कमी प्रतिसाद आहे. लोकमान्य टिळक-तिरुवअनंतपुरम गाडीला 45 टक्‍केच, तर तुतारीला 47 टक्‍के प्रतिसाद मिळत आहे. कारवार एक्‍स्प्रेसला अत्यंत कमी प्रतिसाद आहे. एर्नाकुलम नेत्रावती एक्‍स्प्रेसला मुंबईहून येणाऱ्यांकडून 112 टक्‍के तर परतीसाठी 75 टक्‍केपर्यंत आरक्षण आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Less Response To Tutari Express More Response To Long Route Trains