अवाजवी वीज बिले, अधिकारी धारेवर

महेश बापर्डेकर
Friday, 31 July 2020

चार महिने रिडिंग घेतले नाही त्याचा फटका ग्राहकांना का? असा सवाल उपस्थित करत वीज बिल भरणारच नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

आचरा (सिंधुदुर्ग) - वाढीव वीज बिलांनी हवालदिल झालेल्या आडवली-मालडी मतदारसंघातील ग्रामस्थांनी मालवण पंचायत समिती उपसभापती राजू परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली आचरा विद्युत कार्यालयाला धडक दिली. शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर वाढीव बिलाचा टाकलेला भार भरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. महावितरणकडून जर मिटर तोडण्याचा प्रयत्न केला तर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला. 

एप्रिलपासून वाढीव दरही कमी करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वाढीव विज बीलांमधून ग्राहकांना विद्युत मंडळाने जोराचा झटका दिला आहे. या बिलांबाबत संतापलेल्या आडवली-मालडी जिल्हा परिषद मतदारसंघातील मठबुद्रूक, पाणलोस, श्रावण, आडवली, निरोम, रामगड, गोठणे येथील ग्रामस्थांनी आज दुपारी येथील विद्युत मंडळ कार्यालय गाठले. तसेच अवाजवी बीलाबाबत नाराजी व्यक्त केली.

चार महिने रिडिंग घेतले नाही त्याचा फटका ग्राहकांना का? असा सवाल उपस्थित करत वीज बिल भरणारच नसल्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी मालवण उपसभापती परुळेकर यांच्या हस्ते विजमंडळाचे अभियंता मुगडे, सहाय्यक अभियंता श्रीमती माने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप विभागिय अध्यक्ष प्रशांत परब, निलेश बाईत, विनायक बाईत, बाबू परब, तुषार हाटले, उदय सावंत, घनश्‍याम चव्हाण, प्रकाश सावंत, उमेश घाडी आदी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी विद्युत मंडळाचे मुगडे यांनी ग्रामस्थांचे म्हणणे वरीष्ठांपर्यत पोहोचवण्याची ग्वाही उपस्थितांना दिली. 

वाचा - चक्रीवादळात महावितरणचा दिवा ; 50 दिवसांत 628 गावे पुन्हा प्रकाशली 

बिले चुकीच्या पद्धतीने 
यावेळी उपसभापती परुळेकर यांनी सांगितले, की चार महिन्यानंतर आलेली वीज बिले ही चुकीच्या पद्धतीने डबल दराने आली आहेत. दर महिन्याला बिले आली असती तर ग्राहकांना दहा-पंधरा हजारांची बिले आली नसती. शासनाने विद्युत मंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर वाढीव बिलाचा भार टाकला आहे. याबाबत शासनाचा निषेध करत असून वाढीव बिले न भरण्याचा इशारा त्यांनी दिला. संचारबंदीमधील एका महिन्याच्या वीज बिलात सुट द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: light bill issue advali village konkan sindhudurg