गेल्या वर्षभरात 28, 480 थकबाकीदारांकडून महावितरणला रुपयाही नाही 

तुषार सावंत
Saturday, 20 February 2021

महत्वाची बाब म्हणजे जिल्ह्यातील 28 हजार 480 ग्राहकांनी गेल्या वर्षभरात एक रुपयाचेही थकीत वीजबिल भरलेले नाही. या ग्राहकांची 23 कोटी 6 लाखाची थकबाकी आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांतर्फे ही माहिती देण्यात आली. 

कणकवली (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गातील तब्बल 1 लाख 2543 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा लवकरच बंद केला जाणार आहे. या ग्राहकांकडून महावितरणला तब्बल 44 कोटी 60 लाख रुपये येणे बाकी आहे. महत्वाची बाब म्हणजे जिल्ह्यातील 28 हजार 480 ग्राहकांनी गेल्या वर्षभरात एक रुपयाचेही थकीत वीजबिल भरलेले नाही. या ग्राहकांची 23 कोटी 6 लाखाची थकबाकी आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांतर्फे ही माहिती देण्यात आली. 

थकीत ग्राहकांकडून वीज बिलांचा भरणा होत नसल्याने महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे महावितरणने थकीत वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने आज कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. यात त्यांनी थकीत वीजबिलाचा आढावा घेतला. तसेच वीज थकबाकीच्या अनुषंगाने अधीक्षक अभियंता ते कनिष्ठ अभियंता यांच्या कामाचा आढावाही घेतला. यात त्यांनी थकीत ग्राहकांना वीज बिले भरल्याशिवाय पर्याय नाही हा संदेश प्रत्येक ग्राहकांपर्यंत पोचवा असेही निर्देश दिले. तसेच जे ग्राहक विनाकारण वीज बिले भरण्यास टाळाटाळ करत असतील त्या थकीत ग्राहकांना वीज पुरवठा खंडित करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. 

दरम्यान, वीज बिलांच्या वसुली वेळी ग्राहक आणि महावितरण कर्मचारी यांच्यात वादंगाचे प्रकार घडतात. मात्र महावितरणच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांवर कसलाही प्रसंग ओढवला तरी महावितरण त्यांच्या भक्‍कम पाठीशी राहील. सर्वच कर्मचाऱ्यांनी महावितरणचे तसेच वीज वसुलीचे काम नेटाने करावे असेही आवाहन मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. 

महावितरण कंपनी वाचवायची तर बिल भरणे गरजेचे आहे. ही बाब ग्राहकांपर्यंत पोचवत आहेत. ज्यांना एकदम थकबाकी भरणे शक्‍य नसेल अशांना हप्त्याने बिल भरण्याची सवलत देत आहोत; मात्र थकीत बिल भरावेच लागणार आहे. 
- देवेंद्र सायनेकर, मुख्य अभियंता महावितरण कोकण परिमंडळ 

 

विभाग निहाय थकबाकी 
*आचरा 3 कोटी 87 लाख 
*देवगड 6 कोटी 20 लाख 
*कणकवली 11 कोटी 58 लाख 
*वैभववाडी 5 कोटी 9 लाख 
*कुडाळ शहर विभाग 9 कोटी 35 लाख 
*कुडाळ ग्रामीण विभाग 3 कोटी 18 लाख 
*सावंतवाडी शहर विभाग 3 कोटी 9 लाख 
*सावंतवाडी ग्रामीण विभाग 9 कोटी 32 लाख 
*वेंगुर्ले 6 कोटी 61 लाख 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: light bill issue konkan sindhudurg