सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला 'यासाठी' लिम्का बुकचे प्रमाणपत्र  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Limca Book Of Records Certificate To Sindhudurg ZP

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात राज्यात आघाडीवर राहिली आहे. अशाचप्रकारे जिल्हा परिषदेने मासिक पाळी जनजागृतीसाठी उत्कर्षा उपक्रम सुरु केला होता.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला 'यासाठी' लिम्का बुकचे प्रमाणपत्र 

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - जिल्हा परिषदेने 24 जानेवारी 2019 ला राबविलेल्या शासकीय सामुदायिक हळदीकुंकू कार्यक्रमाअंतर्गत अवघ्या तीन तासात 4 लाख 242 सॅनिटरी नॅपकीनचे वाटप केले होते. त्याची दखल घेत "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'ने नोंद केली होती. त्याचे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात राज्यात आघाडीवर राहिली आहे. अशाचप्रकारे जिल्हा परिषदेने मासिक पाळी जनजागृतीसाठी उत्कर्षा उपक्रम सुरु केला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने 2018 मध्ये उत्कर्षा प्लस कार्यक्रम सुरु करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 50 वयोगटातील एक लाख महिलांचा सर्व्हे करण्यात आला होता.

या सर्व्हेत जिल्ह्यातील महिला मोठ्या संख्येने मासिक पाळी कालावधीत सॅनिटरी नॅपकिनचा वापर करीत नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे 24 जानेवारी 2019 ला दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत शासकीय हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायती, 8 पंचायत समित्या व 1 जिल्हा परिषद अशा 438 शासकीय संस्थांत एकाचवेळी हा कार्यक्रम झाला. यावेळी महिलांना वाण म्हणून जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्यावतीने सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले होते. या तीन तासांत तब्बल 4 लाख 242 एवढी सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आली होती. त्याची नोंद घेतल्याचे "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'ने फेब्रुवारीत जिल्हा परिषदेला ई-मेलद्वारे कळविले होते. हा रेकॉर्ड झाल्याचे प्रमाणपत्र 9 मार्चला जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे.

या प्रमाणपत्रावर "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'च्या एडिटर वत्सला कौल बनेर्जी यांची स्वाक्षरी आहे. या यशाने जिल्हा परिषदेच्या मानांकनात अजुन एक भर पडली असल्याची प्रतिक्रिया जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश जोंधळे यांनी व्यक्त केली आहे. 

loading image
go to top