खासगी वाहतूकदारांना एसटी भाड्याच्या दीडपट दराची मर्यादा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 August 2019

खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती कि. मी. भाडेदराच्या 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक भाडेवाढ करता येणार नाही. तसे झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली. 

रत्नागिरी - राज्यातील खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांकडून होणाऱ्या मनमानी भाडेदराला परिवहन आयुक्तांनी चाप लावला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) त्या, त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे भाडेदर विचारत घेतले जाणार आहेत. खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती कि. मी. भाडेदराच्या 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक भाडेवाढ करता येणार नाही. तसे झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली. 

गणेशोत्सव काळामध्ये खासगी ट्रॅव्हल्सधारकांकडून वारेमाप भाडेवाढ केली आहे. त्या अनुषंगाने परिवहन आयुक्तांच्या 21 ऑगस्टच्या पत्रानुसार राज्यातील खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांकडून मनमानी भाडे आकारणीबाबत नवीन आदेश राज्यातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या, त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सध्याचे भाडेदर विचारत घेतले आहेत.

खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती कि.मी. भाडेदराच्या 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक राहणार नाही. तसे कमाल भाडेदर शासनाने 27 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयानुसार निश्‍चित केले आहेत. 

राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना परिवहन आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात आगामी सुरू होणाऱ्या गर्दीच्या हंगामाच्या अनुषंगाने या कार्यालयाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत.

यानुसार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कार्यक्षेत्रातील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस मालकांची गुरुवारी (ता. 22) बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये उपस्थित सर्व बसमालकांना याप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कार्यालयीन सर्व कार्यकारी अधिकारी यांना आदेशाप्रमाणे कडक अंमलबजवाणी करण्याचे आदेश दिले आहेत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

सातत्याने खातरजमा करण्याची सूचना 
गर्दीच्या हंगामात खासगी बस मालकांकडून शासनाने निश्‍चित केलेल्या प्रती कि. मी. भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारत नाहीत ना, याची सातत्याने खातरजमा करावी, या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करावी, खासगी वाहतूकदारांनी निर्धारित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास सदर वाहतूकदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Limit of one and a half times the ST fare rate for private travelers