रेशन कार्डला करा आधार लिंक, अन्यथा मोफत धान्य बंद 

तुषार सावंत
Wednesday, 30 September 2020

सरकारने वन नेशन, वन रेशन कार्ड अंतर्गत मोफत रेशन जाहीर केले. त्याअंतर्गत कोणत्याही राज्यात राहणारे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

कणकवली (सिंधुदुर्ग) - लॉकडाउनमुळे प्रवासी मजुरांसह बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गमावल्या. ज्यामुळे त्यांना रोजीरोटीपासून अन्नापर्यंतची समस्या होती. अशा लोकांना मदत करण्यासाठी सरकारने वन नेशन, वन रेशन कार्ड अंतर्गत मोफत रेशन जाहीर केले. त्याअंतर्गत कोणत्याही राज्यात राहणारे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. केंद्रीय अन्न मंत्रालयाने रेशन कार्डला आधारशी लिंक करण्यासाठी अंतिम तारीख उद्यापर्यंत (ता.30) दिली आहे. आधार लिंक नसल्यास मोफत धान्य वितरण बंद होणार आहे. 

कोरोना रोखण्यासाठी देश लॉकडाउन झाला. त्यामुळे गरीब कुटुंबाच्या अन्नाचा प्रश्‍न गंभीरपणे उभा राहिला. अशा काळात सरकारने मोफत राशन वाटप करून दिलासा दिला आहे. मोफत धान्यवाटप आताही सुरूच आहे; मात्र ज्या शिधापत्रकधारकांनी अद्याप रेशनकार्ड आधारशी जोडलेले नाहीत. त्यांना यापुढील काळात मोफत धान्य सुविधेचा लाभ मिळणार नाही. त्यांना पूर्वीप्रमाणे रेशन मिळणार आहे. त्यांचे रेशनकार्ड देखील रद्द केले जाणार नाही; परंतु जर आधार त्यांच्याशी जोडला गेला तर भविष्यात त्यांना सहज धान्य मिळेल. आतापर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 32 हजार रेशनकार्डपैकी 90 टक्के आधारशी जोडली गेली आहेत. 10 टक्के लोक अद्याप यामध्ये सामील झालेले नसल्याचे समोर आले आहे. 

अशी आहे प्रक्रिया 
रेशनकार्डला आधारशी जोडण्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करू शकता. यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन (यूआयडीएआय) या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर त्यात लॉग इन करावे लागेल. ऑप्शनवर क्‍लिक केल्यानंतर पत्ता, तपशील भरावा लागेल. ज्यात आपला जिल्हा व राज्य निवडले जाईल. सर्व माहिती संकेतस्थावर भरल्यानंतर आपले रेशनकार्ड आधारशी लिंक केले जाईल. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Link Aadhaar to ration card. Otherwise you will not get free grain