घोणसरीत दोन हातभट्ट्या उद्‌ध्वस्त 

तुषार सावंत
Sunday, 18 October 2020

घोणसरी गावात गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती.

कणकवली (सिंधुदुर्ग) - घोणसरी (ता.कणकवली) गावातील दोन गावठी दारूच्या हातभट्ट्या पोलिसांनी उद्‌ध्वस्त केल्या. आज सकाळी 8 ते 8.30 या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यात एकूण 1 लाख 83 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तर तिघांवर कारवाई करण्यात आली. 

घोणसरी गावात गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार आज सकाळी पोलिस उपनिरीक्षक सचिन शेळके, पोलिस उपनिरीक्षक शाहू देसाई, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र शेळके आदींच्या पथकाने घोणसरी येथे जाऊन गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर छापा टाकला.

यात एका ठिकाणी व्हिक्‍टर बस्त्यांव बारेत (वय 62) तर दुसऱ्या ठिकाणी जॉन मोतेस पिंटो (वय 51) हे दोघे गावठी दारू तयार करता असताना आढळले. तर अन्य एका ठिकाणी ज्योस्तीन बारेत (वय 50) ही महिला गावठी दारूची विक्री करताना आढळून आली. या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली. तर तेथील 1 लाख 83 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत हवालदार गुरुनाथ कोयंडे, प्रकाश कदम, पोलिस नाईक कृष्णा केसरकर, जयेश सरमळकर, ज्ञानेश्वर कांदळगावकर, संकेत खाडये आदी सहभागी झाले होते. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The liquor kilns at Ghonsari were destroyed by the police