रत्नागिरीत उभारणार साहित्यिक गुढी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

शालिवाहनाने शकांचा पराभव करण्यासाठी मातीच्या सहा हजार सैनिकांचे पुतळे तयार केले. त्यात प्राण फुंकून शकांचा पराभव केला व मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निर्जीव झालेल्या समाजात चैतन्य, स्वाभिमान आणि अस्मिता जागृत केली. त्याप्रमाणे साहित्यिक गुढीतून वाचक, लेखक तयार करण्याचा प्रयत्न जनसेवा ग्रंथालय करीत आहे.
- प्रकाश दळवी, अध्यक्ष

रत्नागिरी - मराठी साहित्यात चैतन्य यावे, साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, नवे साहित्यिक घडावेत या उद्देशाने जनसेवा ग्रंथालयातर्फे सलग दुसऱ्या वर्षी औत्सुक्‍याचा विषय ठरलेली साहित्यिक गुढी उभारण्यात येणार आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी शुक्रवारी (ता. ५) सकाळी दहाला जनसेवा ग्रंथालयाच्या प्रांगणात ही साहित्यिक गुढी उभारण्यात येणार आहे.

साहित्य विश्वातील हा आगळा-वेगळा असा उपक्रम आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीला पुस्तकांची माळ असलेली साहित्यिक गुढी उभारण्यात येईल. या प्रसंगी गुढीची पूजा व ग्रंथपूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर मराठी साहित्याचा पाया रचणाऱ्या संत साहित्याच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते होईल. साहित्यिक गुढीनिमित्त संत तुकाराम महाराज आणि त्यांचे अभंग साहित्य या विषयावर निवृत्त शिक्षक सु. द. भडभडे मार्गदर्शन करतील.

गेल्या वर्षीसुद्धा अशा प्रकारे साहित्यिक गुढी जनसेवा ग्रंथालयाने उभी केली होती. शालिवाहनाच्या पराक्रमाच्या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहनाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक सुरू करण्यात आले. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिप्रदा. विजय मिळवला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळवला ते शक अशा दोघांचाही अंतर्भाव शालिवाहन शकामध्ये झाला.

महाराष्ट्रात सर्वत्र गुढी उभारली जाते. नव्याची सुरवात आणि नव्याची निर्मिती असा साधासोपा अर्थ या सणाचा आहे. त्या अनुषंगाने मराठी साहित्य विश्वात नव्याची निर्मिती व्हावी अर्थात वाचन आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध जनसेवा ग्रंथालयातर्फे साहित्यिक गुढी उभारली जाणार आहे.

शालिवाहनाने शकांचा पराभव करण्यासाठी मातीच्या सहा हजार सैनिकांचे पुतळे तयार केले. त्यात प्राण फुंकून शकांचा पराभव केला व मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निर्जीव झालेल्या समाजात चैतन्य, स्वाभिमान आणि अस्मिता जागृत केली. त्याप्रमाणे साहित्यिक गुढीतून वाचक, लेखक तयार करण्याचा प्रयत्न जनसेवा ग्रंथालय करीत आहे.
- प्रकाश दळवी
, अध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: literature Gudi in Ratnagiri