एकावं ते नवलच ; येथे खोदलीय चक्क 'लाॅकडाऊन' विहीर

राजेश शेळके 
Thursday, 23 July 2020

वेळवंड येथील भायजेवाडीतील ग्रामस्थांनी विहीर खोदून लॉकडाऊनच चिरंतन केला.

रत्नागिरी - तालुक्यातील वेळवंडमधील भायजेवाडीतील ग्रामस्थांनी केलेला पराक्रम कायमस्वरूपी स्मरणात राहणारा आणि आदर्श सामुहिक कामाचा ठरला आहे. वाडीसाठी थोडी थोडकी नव्हे; तर 40 फुट विहिर खोदली आहे. त्यामुळे वाडीची तहान भागविणार्‍या ‘लॉकडाऊन विहिरीची सध्या चर्चा आहे.

महादेव गोपाळ भायजे यांनी आपल्या कुटुंबाच्या वाट्याला आलेल्या जमिनीत विहीर खोदण्यासाठी जागा दिली. दगडातून पाणी काढणे म्हणजे रक्ताचे पाणी करण्यासारखे आहे. तरुण मुलांना विहिर खोदण्याचा अनुभव नव्हता. काही तरुण मुंबईतून आलेले तर काही रंगकाम, बांधकाम करणारे होते. पण जुन्याजाणत्या लोकांच्या मार्गदर्शनखाली सतत तीन महिने मेहनत व चिकाटीच्या जोरावर त्यांनी विहिर खोदली. सध्या या विहिरीला मुबलक पाणी आहे.
 

वेळवंड येथील भायजेवाडीतील ग्रामस्थांनी विहीर खोदून लॉकडाऊनच चिरंतन केला. शिवाय गावकऱ्यांनी या विहिरीचे नावच लॉकडाऊन असे ठेवले आहे. 10 घरांच्या  भावकीने वाडीच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांत 40 फूट विहीर खोदली. लॉकडाऊनच्या दुःखद आठवणींनाही सुखद करत कायम स्मरणात राहिल असं काम या गावाने केले आहे. विहीर खोदून झाली, पाणी मुबलक लागले, मात्र आता हे पाणी घरापर्यंत पोचवण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

हे पण वाचा सुर्याभोवती वर्तुळाकार कक्षा पूर्ण करणारा निओवाईस धुमकेतू रत्नागिरीत दिसला : बीएस्सीचे शिक्षण घेणार्‍या कपिलने टिपली छायाचित्रे.. 

विहीर खोदण्याच्या कामात पुरुषांबरोबर महिलांचाही मोलाचा वाटा आहे. नारायण भायजे, गणपत भायजे यांच्यासारख्या अनुभवी लोकांच्या मार्गदर्शन व सहकार्य यामुळे लॉकडाऊनचा खरा उपयोग करता आला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर परशुराम कदम व साक्षी रावणंग, संतोष गुरव, मनीष मोहिते यांच्या उपस्थितीत विहिरीचे पूजन करून विहिरीला ’लॉकडाऊन विहीर’ असे नाव देण्यात आले, अशी माहिती तुकाराम भायजे यांनी दिली.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lock down name given to Well in ratnagiri