
रत्नागिरी : गतवर्षी कोरोनामुळे अनंत अडचणींना सामोरे जावे लागलेल्या हापूस व्यावसायिकांवर पुन्हा टाळेबंदीची टांगती तलवार निर्माण झाली आहे. टाळेबंदीतील थेट विक्रीचा फंडा यंदा अनेक आंबा उत्पादकांनी अवलंबला असून पुणे, मुंबईसह कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये विक्रीसाठी साखळी निर्माण केली आहे. यामधून आंबा उत्पादकांना रोख पैसे आणि दरही चांगला मिळत आहे. आधीच उत्पादन कमी असल्यामुळे दर चढे आहेत.
गतवर्षी टाळेबंदीमुळे बागायतदारांना आंबा झाडावरून काढता आला नाही. विक्रीची साखळी निर्माण करण्यासाठीही कसरत करावी लागली. एप्रिल महिन्यात कृषी, पणन विभागाच्या साह्याने थेट ग्राहकांपर्यंत हापूस पोचवण्याची साखळी उभारली. दलाल कमी झाले. नवीन तरुणांनी ऑनलाइन विक्रीसह थेट ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी साखळी तयार केली. फळ बाजारातील दलालांपेक्षा या पद्धतीने विक्री व्यवस्थेत उत्पादकाला दर चांगला मिळू लागला आहे. यासाठी मुंबई, पुण्यासह कोल्हापूर, नाशिक, नागपूर यासारख्या मेट्रो सिटींची निवड व्यावसायिकांनी केली आहे. तेथील अनेक व्यावसायिक यापूर्वी फळ बाजारातील दलालांकडून आंबा खरेदी करून विकत होते. यंदा उलट परिस्थिती आहे. या शहरांमधील व्यावसायिक थेट आंबा उत्पादकाच्या बागांमध्ये येऊ लागले आहेत.
गतवर्षीपेक्षा यंदा मजबूत
जिल्ह्यातील काही उत्पादकांनी मोठ्या शहरातील सोसायट्यांच्या समूहात एक व्यावसायिक तयार केला आहे. त्याच्या मार्फत दर्जेदार आंबा ग्राहकांना दिला जात आहे. यासाठी व्हॉटस्ॲप, फेसबुकसह वैयक्तिक संपर्काचा उपयोग केला जात आहे. ही साखळी गतवर्षीपेक्षा यंदा मजबूत झाली. भविष्यात यात आणखी वाढ होणार आहे. त्याचा परिणाम वाशीसारख्या फळबाजारात येणाऱ्या हापूसच्या मालावरही होईल.
टाळेबंदीमुळे कसरत
अवकाळी पाऊस, कीडरोगाचा प्रादुर्भाव आणि निसर्ग चक्रीवादळामुळे यंदा उत्पादन कमी आहे. या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भावही वाढू लागला आहे. पुन्हा लॉकडाउनचा निर्णय घेण्याची तयारी शासन करत आहे. याचा फटका हापूस हंगामास बसू नये, म्हणून बागायतदारांची तारांबळ उडेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.