लॉकडाऊनमध्येही या एमआयडीसीकडून सुरळीत पाणीपुरवठा... 

मुझफ्फर खान
मंगळवार, 7 एप्रिल 2020

चिपळूणातून वाहणार्‍या वाशिष्ठी नदीचे पाणी एमआयडीसी उचलते आणि खेर्डी, खडपोलीसह लोटे एमआयडीसीतील उद्योगाना पुरवते. 

चिपळूण - खेर्डी, खडपोली व लोटेतील उद्योगांना लॉकडाऊनच्या काळातही एमआयडीसीने सुरळीत पाणीपुरवठा केला आहे. उद्योगांसह चिपळूण व खेड तालुक्यातील पंधरा गावांना मुबलक पाणीपुरवठा सुरू आहे. विना अडथळा पाणीपुरवठा सुरू असल्यामुळे येथील नागरिक व उद्योजकांनी एमआयडीसीचे आभार मानले. 

चिपळूणातून वाहणार्‍या वाशिष्ठी नदीचे पाणी एमआयडीसी उचलते आणि खेर्डी, खडपोलीसह लोटे एमआयडीसीतील उद्योगाना पुरवते. 

एमआयडीसी होण्यासाठी जागा देणार्‍या गावांना सुविधा म्हणून एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीची पाईपलाईन जीर्ण असल्यामुळे त्यात काहीवेळा तांत्रिक बिघाड होऊन पाणी पुरवठा खंडित व्हायचा. त्यावेळी उद्योगांसह गावातील नागरिकांकडून पाण्यासाठी ओरड व्हायची.  एमआयडीसीचे कर्मचारी तत्काळ तांत्रिक बिघाड दुरूस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करायचे. आठवड्यातील एक दिवस शटडाऊन घेवून अत्यावश्यक दुरूस्ती करायचे. मात्र लॉकडाऊनच्या काळात एकाही दिवशी पाईपलाईनमध्ये बिघाड झालेला नाही त्यामुळे कारखानदर आणि नागरिकांना लॉकडाऊनच्या काळातही एमआयडीसीकडून पुरेसा पाणी पुरवठा केला जात आहे. 

हापूस आंब्यांची पेटी पोहचतेय थेट ग्राहकांच्या दारात अन् रिकाम्या गाड्यात येतोय हा माल...  

याबाबत माहिती देताना एमआयडीसीचे उपअभियंता अशोक पाटील म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात कारखानदार आणि नागरिकांच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही योग्य ती खबरदारी घेतली आहे. जिल्हाधिकार्‍यांची परवानगी घेवून काही कारखाने सुरू करण्यात आले आहेत. त्यांना दररोज पाणी लागते. नागरिक जीवनावश्यक वस्तूंचा साठा करत आहेत. पाण्यासाठी त्यांनी पायपीठ करून नये यासाठी एमआयडीसीचे कर्मचारी दिवसभर सेवा देत आहेत. खेर्डी, खडपोलीसाठी तीन आणि लोटे एमआयडीसीसाठी चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पाण्याची टाकी भरून घेणे, वेळोवेळी पाण्याची पातळी तपासणे, एमआयडीसी आणि गावांकडे जाणारे व्हाल उघडून आवश्यकतेनूसार पाणीपुरवठा करणे आदी काम आमचे कर्मचारी करतात. जलवाहिणीला कुठे गळती लागली आहे का ? याची तपासणी कर्मचार्‍यांकडून केली जाते. छोटी गळती असेल तर तत्काळ दुरूस्त केली जाते. त्यामुळे कारखानदार आणि परिसरातील गावाना अखंडित पाणीपुरवठा सुरू आहे.

एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होणारी गावे

खेर्डी, खडपोली, गाणे, सती, पेढे, परशुराम, वालोपे, धामणवणे, पटवर्धन लोटे, पीर लोटे, सोनगाव, कोतवली, असगनी, आवाशी, घाणेखुंट

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in Locked down water supply are from chiplun MIDC