चिपळूणः लोकमान्य टिळक स्मारकने जपला सांस्कृतिक ठेवा

चिपळूणः लोकमान्य टिळक स्मारकने जपला सांस्कृतिक ठेवा

चिपळूण - येथील लोकमान्य टिळक वाचन मंदिराने वस्तुसंग्रहालय उभारून कोकणचा वैभवशाली सांस्कृतिक ठेवा जपला आहे. उत्तरोत्तर त्यामध्ये वाढ होत आहे. ३०० वर्षांपूर्वीची हस्तलिखिते, ६२ हजार ३४४ ग्रंथसंख्या, १४२७ दुर्मिळ ग्रंथ, लेखकांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या ३०० पुस्तकांचा संग्रहात समावेश आहे.

दोन लाख वर्षांपूर्वीची अश्‍मयुगीन दगडी हत्यारे, हडप्पा इथल्या उत्खननात मिळालेल्या वस्तू, इनामगाव, तेर आदी ठिकाणाच्या संशोधन, उत्खननात सापडलेली भांडी असा दुर्मिळ पुरातन वस्तूंचा खजिनाही येथे आहे. 

‘लोटिस्मा’ने जपला कोकणचा वैभवशाली सांस्कृतिक ठेवा

दगडी वस्तू, मातीची भांडी, खापऱ्या आपल्याला १२ लाख वर्षे मागे घेऊन जातात. पहिल्या शतकातील इराणी कुंभ, सातवाहनकालीन जाते, वीरेश्वर मंदिर परिसरात मिळालेली देवीची महिषासुरमर्दिनी स्वरूप मूर्ती, भोम येथील वाघजाई देवीची मूर्ती, बाराव्या शतकातले वीरगळ, कोरीव दगड, विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्ती, ढाल, तलवारी, तोफगोळा, भाला, जंबी, कट्यार आदी शिवकालीन शस्त्रे, दगडाच्या ठोकळ्यात कोरलेला चारशे वर्षांपूर्वीचा गणपती, कलात्मक कंदील, दुसऱ्या महायुद्धात वापरलेली भूमापन दुर्बिण, वाळूचे घड्याळ, जुने लाकडी टेबलावरील, भिंतीवरील टेलिफोन, वैशिष्ट्यपूर्ण रचनायुक्त बहिर्वक्र भिंग, तिबेटियन घंटा, कालबाह्य वजने, सायाळीच्या काट्यापासून बनविलेली पेटी, दक्षिण धृवावरील दगड, कोकणात मिळणारी अभ्रक, सिलिका, आयर्न ओव्हर, क्वार्टज, बॉक्‍साईट, जांभा आदी खनिजे, जुना सारीपाटाचा खेळ हे सारे येथे मांडण्यात आले आहेत. 

नाण्यांचाही संग्रह
प्राचीन नाणी येथे पाहता येतात. मौर्य, सातवाहन, कुषाणकाळ, शीलाहार, रोमन, पोर्तुगीज डच, शिवकालीन, पेशवेकालीन, इंदूर संस्थान, नागपूर संस्थान, झांशी संस्थान, ग्वाल्हेर संस्थानची पुरातन नाणी, पहिल्या महायुद्धात मिळालेली सन्मानपदके, १२ व्या शतकातील सोन्याचे पद्मटंक व शीलाहारकालीन डाळीच्या एका दाण्याच्या आकाराचे सोन्याचे फनम यामुळे संग्रहालयाचे मूल्य वाढले आहे. 

कोकणातल्या खेडेगावातील स्वयंपाकघर, तिच्यातली भाकरी थापणारी महिला, आजूबाजूचे परिसर ग्रामीण लोकजीवनाचा नजारा दाखवते.
- प्रकाश देशपांडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com