Loksabha 2019 : साखरीआगर,धोपावेला मतदानावर बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

गुहागर - गुहागर तालुक्‍यातील धोपावे आणि साखरीआगरमधील मच्छीमार समाजाने मतदानावर कडकडीत बहिष्कार टाकला. दुपारी ३ वाजेपर्यत ४ मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट आणि ४ ठिकाणी मतदान यंत्राचा संपूर्ण संच बदलावा लागला. दुपारी १ वाजेपर्यंत गुहागर विधानसभा मतदारसंघात ४१ टक्के मतदान झाले होते. 

गुहागर - गुहागर तालुक्‍यातील धोपावे आणि साखरीआगरमधील मच्छीमार समाजाने मतदानावर कडकडीत बहिष्कार टाकला. दुपारी ३ वाजेपर्यत ४ मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट आणि ४ ठिकाणी मतदान यंत्राचा संपूर्ण संच बदलावा लागला. दुपारी १ वाजेपर्यंत गुहागर विधानसभा मतदारसंघात ४१ टक्के मतदान झाले होते. 

धोपावे येथील मच्छीमार समाजाच्या ५ वाड्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे एकाच गावातील ११०० मतदारांनी मतदान केले नाही. याबद्दल बोलताना शिवशंकर पाटील म्हणाले, गेली ३५ वर्ष पाण्याची समस्या आहे. 
राष्ट्रीय पेयजलमधून योजनेला निधी देण्याचे राज्य सरकारने मान्य केले. मात्र निधी दिला नाही. बहिष्काराचे पत्र दिल्यावर दुसऱ्या दिवशी टॅंकर पाठवतो असे सांगूनही तहसीलदारांनी टॅंकर पाठवला नाही. त्यामुळे बहिष्कार घातला.

विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत जो पक्ष आमची समस्या सोडवेल त्या पक्षाला मतदान करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. साखरीआगर येथील मच्छीमारांनीही मतदानावर बहिष्कार टाकल्याने तेथील मतदान केंद्रावर दुपारी ३ वाजेपर्यंत १०९७ पैकी केवळ ६८ मतदारांनी मतदान केले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत ८ मतदान केंद्रांवरील यंत्रणेत समस्या निर्माण झाली. १५२ मळण, ९२ शृंगारतळी, ८६ गुहागर आणि ७६ नवानगर या मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशिन बदलावी लागली. ८८ गुहागर, २२६ अडूर, २२३ पालशेत आणि ६६ पालपेणे येथील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन असा पूर्ण संच बदलावा लागला. त्यामुळे सुमारे ४५ मिनिटे मतदानाचा खोळंबा झाला होता, अशी माहिती प्रशासनाने दिली.

दरम्यान, गुहागर तालुकावासीयांनी सकाळच्या वेळातच मतदानाला पसंती दिली. त्यामुळे मतदान सुरू होतानाच शहरी भागात केंद्रावर रांगा लागल्या होत्या. रानवी येथील अपघातग्रस्त अभिषेक जांभळे यांना नेण्यासाठी निवडणूक प्रशासनाने वाहनाची व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे काही दिव्यांगानीही वाहन सुविधेचा लाभ घेतला.

महिलांचे स्वागत 
गुहागर हायस्कूलमधील सखी मतदान केंद्र फुगे, रंगीत फ्लेक्‍स, कमान आदींनी सजवले होते. मतदान केंद्रातील महिला कर्मचारी मतदानाला येणाऱ्या महिलांचे स्वागत करीत होत्या. ही कल्पना छान असल्याचे माजी नगराध्यक्षा सौ. स्नेहा वरंडे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 boycott on voting in Sagariagar Dhopave