Loksabha 2019 : चिपळूण-संगमेश्वरमधील कमी झालेली टक्केवारी कुणास मारक

संदेश सप्रे
बुधवार, 24 एप्रिल 2019

एक नजर

  • चिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघात कमी झालेली टक्‍केवारी कुणासाठी मारक ठरणार याचीच उत्सुकता
  • मतदारसंघात राष्ट्रवादी, मनसेची स्वाभिमानला साथ
  • भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मात्र धनुष्यबाणच चालवल्याची चर्चा

 

देवरूख - लोकसभा निवडणुकीसाठी चिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघात कमी झालेली टक्‍केवारी कुणासाठी मारक ठरणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. मतदार वाढूनही मागील वेळेपेक्षा तब्बल 5 टक्‍के मतदान कमी झाले. त्यामुळे या मतदारसंघातील मताधिक्‍यावरून दोन्ही उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या मतदानात चिपळूण - संगमेश्‍वर मतदारसंघात 1 लाख 40 मतदान झाले. मतदानाची सरासरी 58 ते 60 टक्‍क्‍यांमध्येच आहे. यात संगमेश्‍वर तालुक्‍यात 62, तर चिपळूण तालुक्‍यात 58 टक्‍के मतदानाची नोंद झाली. मागील निवडणुकीत 65 टक्‍के मतदान होऊन शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत या मतदारसंघातून 24 हजारांनी पुढे होते. कमी झालेली मतदानाची टक्‍केवारी आता कुणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

या मतदारसंघात राष्ट्रवादी, मनसेने स्वाभिमानला साथ दिली. याशिवाय शिवसेनेतील नाराज तर भाजपमधील नवे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वाभिमानच्या दिमतीला उभे राहिले. भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मात्र धनुष्यबाणच चालवल्याची चर्चा आता खुलेआम ऐकायला मिळत आहे. निवडून येणारे दोन्ही उमेदवार हे एनडीएचे विशेषतः मोदींना पाठिंबा देणारे आहेत. याच संभ्रमावस्थेने मतदारांचाही संभ्रम वाढला त्यात टक्‍केवारी घटली. 

यावेळी या मतदारसंघात 25 हजार नवमतदार होते. यातील बहुतांश मतदारांनी मतदानाचा पहिला हक्‍क बजावला. त्यानंतरही टक्‍केवारी वाढली नाही. यामुळे नियमित मतदार मतदानापासून दूर राहिले हाच त्याचा अर्थ आहे. शिवसेनेची स्वतःची ताकद आणि भाजपची मिळालेली अर्धी साथ याच जोरावर विनायक राऊत हे मताधिक्‍याचा दावा करत असले, तरी पूर्ण मतदारसंघातले चित्र या उलट झाल्यास नवल वाटण्यासारखे काहीच नाही. 

घड्याळ-कमळाच्या भूमिकेवर निर्णय 
लोकसभा निवडणुकीत स्वतःचा उमेदवार नसल्याने विधानसभेसाठी ताकद दाखविण्याची नामी संधी राष्ट्रवादीकडे चालून आली होती. राष्ट्रवादीने याच संधीचा फायदा उठवल्याची चर्चा दोन्ही तालुक्‍यात सुरू आहे. यामुळे घड्याळ फ्रीजला तारणार की कमळ धनुष्याला याचे उत्तर मिळवण्यासाठी 23 मेची वाट पाहावी लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Chiplun Sangmeshwar constituency special report