Loksabha 2019 : जाधव-तटकरे मनोमिलनाने आघाडीचा मार्ग सुकर

Loksabha 2019 : जाधव-तटकरे मनोमिलनाने आघाडीचा मार्ग सुकर

गुहागर - रायगडमधील सुनील तटकरे आणि रत्नागिरीतील आमदार भास्कर जाधव या दोन्ही नेत्यांमध्येही वैर सर्वज्ञात आहे. मात्र लोकसभेच्या निवडणुकीपासून त्यांच्यातील दुरावा संपुष्टात आल्याचे पाहायला मिळत आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रचारदौऱ्यात तटकरे आणि जाधवांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली. एकमेकांची काळजी घेण्यातही दोघेही कमी पडत नव्हते.

कोकणात नेते अधिक पण एकमेकांचे पक्के वैरी. कोकणाच्या विकासासाठी हे नेते कधीच एका व्यासपीठावर आले नाहीत. कोकणातील जनतेने राणे-जाधव, तटकरे-जाधव, कदम-गीते, दळवी-कदम, नातू-माने, बने-माने या नेत्यांचे वाद, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अनेक वेळा पाहिल्या आहेत. परंतु या लोकसभा निवडणुकीने अनेकांना जवळ आणले. रामदास कदम आणि अनंत गीतेंमधील तसेच सुनील तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यातील वाद संपल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुहागर तालुक्‍यातील अनेक समस्या सोडविण्यासाठी तटकरेंच्या रूपाने हक्काचा खासदार आपल्याला हवा आहे. त्यांचा माझा राजकीय प्रवास जिल्हा परिषदेपासून सुरू झाला. ग्रामीण भागाच्या विकासाची दृष्टी आम्हा दोघांकडे आहे. त्याचा फायदा विकासासाठी होईल. माझ्या मनातला नेता असे सांगत आमदार जाधवांनी मैत्रीचे अनेक दाखले दिले.

सुनील तटकरे यांनी देखील जाधवांच्या मार्गदर्शनाखाली गुहागरचा विकास करणार. दूरदृष्टीचा, झुंझार, लोकांच्या हृदयांत स्थान असलेला नेता आदी शब्दांत भास्कररावांचे वर्णन केले. दुखरा पाय घेऊनही माझ्या प्रचारासाठी मेहनत घेत असल्याचे सांगितले. यामध्ये इतकी सहजता होती की कोकणच्या नेतेपदावरून एकेकाळी यांच्यात भांडण होते हे कोणालाही सांगून खरे वाटले नसते. 

या मैत्रीचा फायदा तटकरेंना होणार आहे. 2014 च्या निवडणुकीत केवळ एका जाहीर सभेसाठी तटकरे गुहागरला आले होते. यावेळी निर्धार यात्रा, सर्व जिल्हा परिषद गटातील जाहीर सभांसाठी तीन वेळा तटकरे गुहागरमध्ये आले. संपूर्ण विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रवास झाला. आठवडाभराने पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या सभेचे नियोजन जाधवांनी केले. त्यामुळे तटकरेंचा मार्ग अधिक सोपा झाला.

मैत्रीची चर्चा कार्यकर्त्यांमध्येही

आबलोलीतील सभा संपल्यानंतर दोघेही कार्यकर्त्यांच्या घरी सोफ्यावर एकत्र बसून हास्यविनोद करत होते. एकमेकांच्या प्रकृतीची, भोजनाची चौकशी करत होते. वेळणेश्वरमधील सभेला वेळ असल्याचे लक्षात आल्यावर भास्कररावांनीच सुनील तटकरेंना विश्रांती घेण्याची प्रेमळ सूचनाही केली. या मैत्रीची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये कौतुकाने सुरू होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com