esakal | Loksabha 2019 : राजकीय सारीपाट सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Loksabha 2019 : राजकीय सारीपाट सज्ज

लोकसभा निवडणूक अवघ्या काही तासांवर येवून पोहोचली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात गेले पंधरा दिवस प्रचाराचा जोरदार धुरळा उडाला. आता मतदान किती होणार आणि बाजी कोण मारणार याची उत्कंठा निर्माण झाली आहे. प्रचाल कसा झाला, जुनी मतांची गणिते कशी होती, या बरोबरच दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदार संघात निवडणूक सज्जता अशी आहे, याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न...

Loksabha 2019 : राजकीय सारीपाट सज्ज

sakal_logo
By
राजेश सरकारे

मतदान सज्जता
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स उपलब्ध आहेत. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर येण्यासाठी व परतण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

दृष्टिक्षेपात -

 • आत्तापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणूका - 14
 • यावर्षी रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या - 13
 • या मतदार संघात आत्तापर्यंतच्या इतिहासात यंदा सर्वाधिक उमेदवार रिंगणात.
 • मतदानाची तारीख - 23 एप्रिल 2019 
 • मतदारांची संख्या- 14 लाख 40 हजार 
 • रत्नागिरी जिल्हा- 7 लाख 81 हजार
 • सिंधुदुर्ग जिल्हा - 6 लाख 59 हजार 
 • पहिल्यांदा मतदान करणारे मतदार 90,667 हजार
 • प्रमुख लढत विनायक राऊत ( शिवसेना) आणि नीलेश राणे ( महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष) यांच्यात
 • गत निवडणुकीत विनायक राऊत यांनी तत्कालीन कॉंग्रेसचे उमेदवार नीलेश राणे यांचा दीड लाख मतांनी पराभव केला होता. 

व्ही. व्ही. पॅटचा वापर

 • इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र अर्थात ईव्हीएमचा 1990 मध्ये सगळ्यात आधी नेदरलॅंडमध्ये वापर.
 • भारतात 2003 पासून इव्हीएमव्दारे मतदान.
 • गेल्या पाच वर्षात इव्हीएममध्ये हेराफेरीचा आरोप.
 • येत्या निवडणूकीत इव्हीएमला व्होटर व्हेरीफाई पेपर ऑडीट ट्रायल अर्थात व्ही. व्ही. पॅटची जोड.
 • व्ही. व्ही. पॅडमुळे आपण कोणाला मतदान केले याची खात्री.

अशी होणार लढत -
विनायक राऊत- शिवसेना 

अनुकूल घटक 
-  सहा विधानसभा मतदारसंघांपैकी 5 आमदार शिवसेनेचे. 
-  मागील निवडणुकीत दीड लाखाचे मताधिक्‍य
-  नाणार प्रकल्प रद्दचा फायदा
-  पाच वर्षांमध्ये गाव पातळीवर खासदार राऊतांचा संपर्क
-  शिवसेनेच्या सचिव पदाच्या प्रतिष्ठेचा फायदा
-  युतीमुळे भाजपचे पदाधिकारी प्रचारात सक्रिय


नीलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष) अनुकूल घटक 
- सिंधुदुर्गमध्ये नीतेश राणे यांची मोर्चेबांधणी
- नारायण राणे यांचे गुडवील
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात मजबूत संघटना बांधणी
- भाजपतील नाराजीचा फायदा
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अंतर्गत पाठबळाची शक्‍यता

सेनेच्या पाच आमदारांची परीक्षा
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे विनायक राऊत यांचे पारडे जड मानले जातेय. तर सेनेच्या गटांना आणि गणांना हादरा देण्याची रणनीती राणेंकडून खेळण्यात आली. त्यामुळे चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ आणि सावंतवाडी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवसेनेच्या पाच आमदारांचा कस या निवडणुकीत लागणार आहे.

कसा झाला प्रचार?
मुख्यमंत्र्यांची पाठ, ठाकरेच स्टार प्रचारक

लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात संयुक्त सभा घेण्याचे ठरले होते. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकटेच किल्ला लढवताना दिसले.

राणे, राऊत यांचे कुटुंबही प्रचारात
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचे यांची पत्नी शामल, मुलगा गीतेश, मुलगी रुची, सून गिरिजा यांचीही प्रचाराची रणधुमाळी सांभाळली. तर स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे, त्यांच्या पत्नी नीलम, उमेदवार नीलेश राणे आणि आमदार नीतेश राणे यांनीही रत्नागिरी-सिंधुदुर्गात प्रचाराची धुरा सांभाळली होती.

रूसवे, फुगवे, इनकमिंग, आऊटगोईंग 
- यंदाच्या लोकसभेत गावागावात स्वाभिमान आणि शिवसेनेत पक्षप्रवेशाची स्पर्धाच रंगली होती. याखेरीज नाराज कार्यकर्त्यांचे रूसवे, फुगवे काढताना पदाधिकाऱ्यांचा कस लागला. याखेरीज मतदारांचे मन, डोकं आणि मत परिवर्तनासाठी आभासी ताकदीचाही खेळ झाला. याखेरीज गावागावात कुणाचे प्यादे कुठे आहेत, कोण वजीर असेल, कुणाचा उंट कुणाला शह देईल याचीही चाचपणी आणि त्याअनुषंगाने मोर्चेबांधणी शिवसेना, स्वाभिमानकडून झाली.

विकासापेक्षा आरोप-प्रत्यारोपांनी निवडणूक गाजली
- मतदारसंघात किती विकासकामे झाली हा मुद्दा प्रचारात गाजला नाही. तर शिवसेना-भाजपकडून खासदार नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नीतेश राणे यांना टार्गेट करण्यात आले. तर स्वाभिमानकडून पालकमंत्री श्री.केसरकर आणि खासदार विनायक राऊत यांन्यावर टीकेची झोड उठविण्यात आली.

असे आहेत रिंगणातील उमेदवार

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतील उमेदवार आणि त्यांचे चिन्ह असे आहे
1 किशोर वरक - बहुजन समाज पार्टीचे - हत्ती
2 नवीनचंद्र बांदिवडेकर - कॉंग्रेस - हात
3 विनायक राऊत - शिवसेना - धनुष्यबाण
4 नीलेश नारायण राणे - महाराष्ट्र स्वाभिमान - रेफ्रिजरेटर
5 भिकुराम काशिराम पालकर - बहुजन मुक्ती पार्टी - खाट
6 मारूती रामचंद्र जोशी - वंचित बहुजन आघाडी - शिट्टी
7 राजेश जाधव - बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी - एअरकंटिशन
8 ऍड.संजय शरद गांगनाईक - समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक -क्रेन
9 आंबेरकर पंढरीनाथ विद्याधर - अपक्ष - गॅस सिलिंडर
10 नारायण दशरथ गवस - अपक्ष - फणस
11 निलेश भिकाजी भाताडे - अपक्ष - कपाट
12 विनायक लवू राऊत - अपक्ष - तुतारी

चिन्ह आणि नावे
कॉंग्रेसचा हात, सेनेचा धनुष्यबाण, भाजपचे कमळ ही चिन्हे मतदारांच्या लक्षात राहिली आहेत. मात्र पक्षस्थापनेनंतर प्रथमच लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासमोर रेफ्रिजरेटर ही निशाणी आहे. तर अन्य एक उमेदवार नीलेश भातडे यांची निशाणी कपाट आहे. या दोन्ही निशाण्या सारख्याच असल्याने मतदारांचा गोंधळ होण्याची शक्‍यता लक्षात घेवून स्वाभिमानने चिन्हाविषयी जागृती केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत नावाचे दोन उमेदवार आहेत. याखेरीज नीलेश राणे आणि नीलेश भातडे नावाचे अन्य अपक्ष उमेदवार देखील रिंगणात आहेत.

नवमतदारांचा कौल कोणाला?
रत्नागिरी-सिंधुदुर्गात यंदाच्या निवडणुकीत तब्बल 90,667 नवमतदार दाखल झाले आहेत. हा नवमतदार नक्‍की कोणत्या पक्षाला मतदान करणार यावर मताधिक्‍याचे गणित अवलंबून असणार आहे. मतदारसंघनिहाय नवमतदारांमध्ये चिपळूण 24668, रत्नागिरी 23492, राजापूर 8378, कणकवली 11470, कुडाळ 13152, सावंतवाडी 9507 एवढ्या मतदारांचा समावेश आहे.

विकासाचे प्रश्‍न कायम 
कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्र रेल्वेने जोडणे, कोकण रेल्वे गतीमान करणे, बंदरांचा विकास, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, मच्छिमारांसाठी नियोजन, काजू आणि आंब्याच्या निर्यातीसाठी विशेष प्रयत्न करणे, कोकणातून नियमित विमानसेवा सुरू करणे असे अनेक प्रश्न कायम आहेत. हेच मुद्दे पुन्हा प्रचारात येत आहेत. 

सोशल मिडियाचा प्रभावी वापर
- या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान आणि शिवसेना पक्षाकडून सोशल मिडियाचा देखील प्रभावी वापर करण्यात आला. यात विरोधी उमेदवाराची बदनामी आणि पोलखोल करण्याचा प्रकार झाला. तसेच न झालेल्या बैठका, प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे आभासी वातावरण देखील निर्माण करण्यात आले.

""पाच वर्षात कोणताही विकास करू न शकलेल्या आणि नारायण राणे यांनी सुरू केलेल्या विकासाला खो घालणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला घरी बसविल्याशिवाय रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मतदार शांत बसणार नाही. आम्हाला जनतेच्या प्रश्‍नांची जाण आहे. लोकांना जो विकास हवा आहे तो करण्याची धमक आमच्यात आहे. त्यामुळेच इथली जनता निश्‍चितपणे स्वाभिमानच्याच पाठीशी राहणार आहे.''
- नीलेश राणे,
उमेदवार स्वाभिमान पक्ष

""विमानतळ, महामार्ग चौपदरीकरण, रेल्वे प्रकल्पांना चालना तसेच इतर जी आश्‍वासने ती शिवसेना-भाजप युतीने सत्यात उतरवली. कोकणवासीयांचे प्रश्‍न संसदेत मांडले. पुढील पाच वर्षात इथल्या भूमिपूत्रांसाठी रोजगाराची साधने निर्माण करू. हा विश्‍वास इथल्या प्रत्येक मतदारात आहे. त्यामुळे 2014 पेक्षा दुप्पट मताधिक्‍य आम्हाला निश्‍चितपणे असेल.''
- विनायक राऊत,
उमेदवार शिवसेना

""लोकसभेच्या रिंगणात असलेल्या राणे आणि राऊत या दोन्ही उमेदवारांनी सत्ता उपभोगली; पण ते जनतेचे प्रश्‍न सोडवू शकलेले नाहीत. एकमेकांवर टीका करून ते प्रचार करताहेत. आम्ही मात्र विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर गेलो. यात सामान्य मतदारांसह तरुणांचा मला मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे मतदार मझ्या बाजूनेच उभे राहतील असा ठाम विश्‍वास मला आहे.''
- नवीनचंद्र बांदिवडेकर,
कॉंग्रेस उमेदवार

""शासन, प्रशासन स्तरावर सामान्य जनतेची होणारी ससेहोलपट रोखली जावी. कोकणात रोजगाराभिमुख उद्योग यावेत या हेतूनेच मी सरकारी नोकरीचा त्याग करून लोकसभेची निवडणूक लढतोय. मला सर्व घटकांचा पाठिंबा देखील दिला आहे. लोकशाहीप्रमाणे चालत नसलेली प्रशासकीय यंत्रणा यात बदल घडविण्याला माझे प्राधान्य असणार आहे.''
- राजेश जाधव,
उमेदवार रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टी

""रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात धनगर समाजाचे सुमारे दोन लाख मतदार आहेत. या सर्वांसह वंचित घटक आणि अन्य बहुजन वर्गाने मला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या लोकसभेत आमची ताकद सर्वांना दिसेल. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित यासाठीची ही लढत आहे. त्यामुळे गरीब घटकांचा दबलेला आवाज मतपेटीतून व्यक्‍त होईल.''
- किशोर वरक,
उमेदवार बसप 

loading image