Loksabha 2019 : जनता दादागिरी खपवून घेणार नाही - राऊत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

सावंतवाडी - तुमची दादागिरी आता खपवून घेतली जाणार नाही. माझ्यासह पालकमंत्री दीपक केसरकर यांना शिव्यांची लाखोली वाहणाऱ्यांना आता जनताच जागा दाखवून देईल, असा दावा शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आज माडखोल येथे केला.

सावंतवाडी - तुमची दादागिरी आता खपवून घेतली जाणार नाही. माझ्यासह पालकमंत्री दीपक केसरकर यांना शिव्यांची लाखोली वाहणाऱ्यांना आता जनताच जागा दाखवून देईल, असा दावा शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आज माडखोल येथे केला.

भाजप-शिवसेना महायुतीचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री केसरकर, पुष्कराज कोले, बाळा माळकर, अशोक दळवी, अनिल परब, दत्ता कोळमेकर, मायकल डिसोजा, विक्रांत सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. राऊत म्हणाले, ""सर्वसामान्यांची सुखदुःख जाणणारा मी कार्यकर्ता आहे. राणेंनी मला हमाल म्हटले म्हणून मला वाईट वाटणार नाही. लोकांची सेवा करण्यासाठी मतदारांचे ओझे डोक्‍यावर वाहण्यास मला कमीपणा वाटणार नाही.''

ते पुढे म्हणाले, ""टिंगल टवाळी करणाऱ्या आणि माझ्यासह पालकमंत्री केसरकर यांना शिव्यांची लाखोली वाहणाऱ्यांविरोधात मला बोलावे असे वाटत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात मतदारांनी त्यांना जागा दाखवून द्यावी.''

पालकमंत्री केसरकर म्हणाले, ""शिवसेना-भाजपा महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास झाला आहे. मोठ्या प्रमाणात निधी याठिकाणी खर्च झाला आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न केला आहे. जे राणेंना पंचवीस वर्षात सत्तेत राहून करायला जमले नाही ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता आपला पराभव होईल या भीतीने नारायण राणे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते आमच्यावर टोकाची टीका करत आहेत; मात्र येथील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे.''
यावेळी श्री. कोले यांनी सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून विनायक राऊत यांच्या पाठीशी राहा, असे आवाहन केले.

टॉप टेन खासदार
यावेळी श्री. राऊत म्हणाले, ""खासदाराला पाच कोटी रुपयांचा निधी मिळतो; मात्र मी दुप्पट निधी खर्च केला. मागच्या पाच वर्षात निलेश राणे खासदार होते; मात्र त्यांनी 1 कोटी 93 लाख फंड वगळता एक रुपया सुद्धा खर्च केला नव्हता; मात्र मी खासदार झाल्यानंतर त्यांचा अखर्चित फंड आणि माझा फंड असा मिळून पाच वर्षात तब्बल 27 कोटी रुपयाचा निधी मतदारसंघात खर्च केला. टॉप टेन खासदार मी दहाव्या नंबरला आलो. त्यामुळे माझ्यावर झालेल्या टीकेचे जनतेनेच उत्तर द्यावे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Vinayak Raut comment