
समाजात वाईट बातम्या पसरवण्यासाठी अग्रेसर राहण्यापेक्षा सोशल मीडियाचा वापर एखाद्याच्या मदतीसाठी करणं ही काळाची गरज आहे. याचा उत्तम उपयोग दुकानदार व महिला सामाजिक कार्यकर्तीने केला.
विसरलेले लायसन्स मिळाले फेसबुकमुळे, कसे ?
रत्नागिरी - ऑनलाइनच्या जमान्यात अनेक गोष्टी थेट मोबाईलवरून मागवल्या जातात. तसंच हरवलेली व्यक्ती, वस्तू यांचीही माहिती काही क्षणात दूरवर पोचवणारा हा सोशल मीडिया दोन भावांसाठी खूपच उपयुक्त ठरला. काही दिवसांपूर्वी दुकानात विसरलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती फेसबुकवरून मिळाली आणि काही तासातच त्यांनी स्वतः ती दुकानातून ताब्यात घेतली.
समाजात वाईट बातम्या पसरवण्यासाठी अग्रेसर राहण्यापेक्षा सोशल मीडियाचा वापर एखाद्याच्या मदतीसाठी करणं ही काळाची गरज आहे. याचा उत्तम उपयोग दुकानदार व महिला सामाजिक कार्यकर्तीने केला. शहरातील अभ्युदयनगर येथे सुनील गांगण यांचे समर्थ जनरल स्टोअर्स असून अलीकडे त्यांनी झेरॉक्सची सेवाही उपलब्ध करून दिली. याच दरम्यान त्यांच्याकडे शुभम पालकर (रा. सन्मित्रनगर), शरद हातफले आणि संतोष हातफले (साठरे बांबर, कशेळी) यांचे लायसन्स झेरॉक्स काढल्यानंतर दुकानात राहिले. त्यांनी ही तिन्ही लायसन्स जपून ठेवली होती.
या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या सोनाली सावंत या गांगण यांच्या मुलीचे वाटेत पडलेले शाळेचे आयकार्ड परत देण्यासाठी गेल्या असता तिथे त्यांना या लायसन्सविषयी समजले. त्याचे फोटो काढून सावंत यांनी व्हॉटस्ऍपवर पाठवले. फेसबुकवर हातफले यांचे नाव शोधून त्यांना या लायसन्सबाबत मेसेज केला. काही तासांतच हातफले पत्ता शोधत गांगण यांच्या दुकानात पोहोचले आणि त्यांची दोन्ही लायसन्स परत मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत आभार मानले. अशाच प्रकारे शुभम पालकर, सन्मित्रनगर याचे लायसन्स त्याच्यापर्यंत लवकर पोहोचावे यासाठी गांगण आणि सावंत प्रयत्न करत आहेत.
Web Title: Lost Licence Got Through Facebook Ratnagiri Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..