लांज्याची कन्या मधुलिकाचे यूपीएससीत यश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

लांजा - लांजाची सुकन्या मधुलिका विजय देवगोजी हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी परीक्षेत १९० व्या रॅंकमध्ये उत्तीर्ण झाली आहे. आपल्या यशाने तिने लांजा तालुक्‍याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.  

लांजा - लांजाची सुकन्या मधुलिका विजय देवगोजी हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी परीक्षेत १९० व्या रॅंकमध्ये उत्तीर्ण झाली आहे. आपल्या यशाने तिने लांजा तालुक्‍याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.  

लांजा तालुक्‍याची सुकन्या असलेल्या मधुलिका देवगोजी-कदम हिचे प्राथमिक शिक्षण लांजा शाळा क्र. ५ मध्ये झाले. आई विजयालक्ष्मी देवगोजी या व्यवसायाने पॅथॅलॉजिस्ट. मधुलिकाचे पाचवीपर्यंतचे शिक्षण लांजा हायस्कूल येथे झाले. यानंतर रत्नागिरी येथील नवोदय विद्यालयासाठी निवड झाली.

दहावीच्या परीक्षेत तिने नवोदय विद्यालयात पहिल्या, तर पुणे विभागात दुसऱ्या क्रमांकाने येण्याचा बहुमान पटकाविला होता. पुणे येथील गरवारे कॉलेजमध्ये अकरावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मधुलिकाने ईटन एमएनसी या कंपनीमध्ये दोन वर्षे सेवा बजावली. मात्र नोकरीचा राजीनामा देऊन यूपीएससी परीक्षेवर लक्ष केंद्रित केले. परीक्षेसाठी लागणारी आर्थिक तरतूद तिने दोन वर्षे केलेल्या नोकरीच्या पगारातून केली. डिसेंबर २०१७ मध्ये तिचा विवाह फलटण गिरवी येथील अक्षय कदम यांच्याशी झाला. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी २०१८ च्या परीक्षेसाठी १० लाख ६९ हजार ५५२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ लाख ९३ हजार ९७२ विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १० हजार ४६८ विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा दिली होती. यातील १९९४ विद्यार्थ्यांच्या मुलाखती झाल्या. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने अंतिम निकाल जाहीर केला आहे. या निकालातून ७५९ उमेदवारांची आयएएस (१८०), आयएसएस (३०), आयपीएससाठी (१५०), गट अ (३८४), गट ब (६८) पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. 

सासर आणि माहेर अशा दोन्हीकडील मंडळींची चांगली साथ लाभल्यानेच आपण ‘यूपीएससी’सारख्या स्पर्धा परीक्षेचे शिवधनुष्य पेलू शकले.
- मधुलिका देवगोजी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhulika Devgoji success in UPSC Exam