शासनाच्या कारभारावर ताशेरे, मनसेचे कार्यकर्ते का झाले आक्रमक? वाचा... 

नंदकुमार आयरे
Tuesday, 8 September 2020

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्यावतीने आज जिल्हा रुग्णालयासमोर जन आक्रोश आंदोलन छेडले. जिल्हा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात ताशेरे ओढले.

सिंधुदुर्गनगरी (सिंधुदुर्ग) - जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात आज जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा रुग्णालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्यावतीने आज जिल्हा रुग्णालयासमोर जन आक्रोश आंदोलन छेडले. जिल्हा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात ताशेरे ओढले. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर ज्या वस्तू, साधन सामग्रीची खरेदी झाल्या, त्या चढत्या दराने मंजूर करून शासनाने आर्थिक लूट केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. याबाबत संबंधितांची चौकशी व्हावी, डॉक्‍टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा तात्काळ भराव्यात, अशी मागणी केली.

या व्यतिरिक्त जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टर्स, नर्ससला आठवड्यातून किमान एक दिवस सुट्टी द्यावी, कोरोनापासून संरक्षण मिळावे, यासाठी साधनसामग्री पुरवावी, उपसंचालक व जिल्हा शल्य चिकित्सक हे बदल्या व भरती प्रक्रियेत करित असलेल्या गैरव्यवहारांची चौकशी करावी, जिल्हा रुग्णालयांमध्ये एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या कराव्यात,

रुग्णांना चांगल्या प्रकारचे जेवण द्यावे, रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करावे, जिल्ह्यात रुग्णालयासाठी खरेदी होणारी साधन सामग्री जिल्ह्यातूनच खरेदी करावी, जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयातील सफाई कामगारांच्या प्राप्त झालेल्या कमी दराच्या निविदा नाकारून चढत्या दराने एका ठेकेदाराला मंजूर केलेल्या निवेदनात रद्द कराव्यात, यासह विविध 15 मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून मनसेच्यावतीने करण्यात आल्या. 

या आंदोलनात माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासह मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाप्रमुख प्रसाद गावडे, आप्पा मांजरेकर, सचिन तावडे, चंदन मेस्त्री, गुरुदास गवंडे, विनोद सांडव, दत्ताराम बिडवडकर आदी पदाधिकाऱ्यांसह मनसेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या 
- खरेदी साहित्याचे चढ्या दराने विक्री 
- शासनाकडून आर्थिक लुट 
- रिक्त जागा तत्काळ भरा 
- गैरव्यवहारांच्या चौकशीची गरज 

कडक पोलिस बंदोबस्त 
जिल्हा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आज मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. जिल्हा रुग्णालय परिसर सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. त्यामुळे आज जिल्हा रुग्णालयात पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra navnirman sena agitation konkan sindhudurg