वाढीव वीजबिलप्रश्नी मनसे आक्रमक, उचलले टोकाचे पाऊल

अजय सावंत
बुधवार, 29 जुलै 2020

पूर्ववत पद्धतीनुसार वीज मीटर रीडिंग घेऊन वीज बिल आकारणी केली आहे; परंतु यासाठीची पद्धत सदोष असल्याने ग्राहकांना नाहक वाढीव आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - लॉकडाउन कालावधीतील वाढीव वीज बिल आकारणीबाबत आज मनसे आक्रमक झाली. महावितरण ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप करीत अधीक्षक अभियंत्यांना घेराओ घातला. बिल आकारणीतल्या त्रुटी दुरूस्त करून पुर्नआकारणीची मागणी तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केली. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र वीज वितरण कंपनी सिंधुदुर्ग मंडळचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची भेट घेऊन वाढीव बिलांसंदर्भात निवेदन दिले. यात म्हटले आहे, की जागतिक कोरोना विषाणू आपत्ती पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशासह जिल्ह्यातही 24 मार्चला संचारबंदी लागू केली होती. परिणामी ग्राहकांचे प्रती महिना वीज वापर मीटर रिडिंग प्रत्यक्ष घरोघरी जाऊन घेणे शक्‍य नसल्याने उर्जा विभागाने वीज आकारणीस अंशतः स्थगिती दिली होती; परंतु आता संचारबंदीत शिथिलता आल्याने महावितरणकडून पूर्ववत पद्धतीनुसार वीज मीटर रीडिंग घेऊन वीज बिल आकारणी केली आहे; परंतु यासाठीची पद्धत सदोष असल्याने ग्राहकांना नाहक वाढीव आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

महावितरण व्यवस्थापनाकडून सरसकट बेरीज करून बिल आकारणी केल्याचे प्राप्त बिलांवरून दिसून येत आहे. सरसकट एकूण बिल भरल्यास 2 टक्के रक्कम सूट देण्याचे भासवून आपला गैरप्रकार झाकण्याचा प्रयत्न करत आहे. ही पद्धत चुकीची असून वीज बिल पुर्नआकारणी करण्यात यावी. 

वीज जोडणी तोडू नका 
संचारबंदीमुळे ठप्प अर्थचक्राचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वीज बिल थकीत ग्राहकांना बिल भरण्यासाठी वाढीव मुदत देवून भरणा करेपर्यंत त्यांची जोडणी कोणत्याही परिस्थितीत खंडित करू नये, अशी मागणी मनसेने केली. मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, सचिव राजेश टंगसाळी, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, जिल्हा सचिव बाळा पावसकर, उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे, जगन्नाथ गावडे, अविनाश अणावकर, विभाग अध्यक्ष अनिल कसालकर, सुंदर गावडे, रामा सावंत, हितेंद्र काळसेकर आदी उपस्थित होते.  

संपादन - राहुल पाटील 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Navnirman Sena protests against electricity bills