होड्यांना उधाणाचा तडाखा, लाखाचे नुकसान 

प्रशांत हिंदळेकर
Saturday, 19 September 2020

या सागरी उधाणाचा फटका चिवला किनाऱ्यावरील रापणकर मच्छीमारांच्या दोन होड्यांना बसला.

मालवण (सिंधुदुर्ग) -: समुद्री उधाणाचा तडाखा चिवला बीच येथील रापणकर मच्छीमारांच्या होड्यांना बसला. दोन्ही होड्या जाळ्यांसह समुद्रात वाहून गेल्या; मात्र हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिक मच्छीमारांनी घटनास्थळी धाव घेत होड्या व जाळ्या बाहेर काढण्यात यश मिळविले. यात होड्या व जाळ्यांचे सुमारे 1 लाखांचे नुकसान झाले. 

काल सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर आजच्या दुसऱ्या दिवशीही कायम होता. यात आज समुद्राला मोठे उधाण आले होते. या सागरी उधाणाचा फटका चिवला किनाऱ्यावरील रापणकर मच्छीमारांच्या दोन होड्यांना बसला. समुद्राला मोठी भरती येणार असल्याची कल्पना असल्याने रापणकर मच्छीमारांनी नौका वर काढल्या होत्या; मात्र आज दुपारी आलेल्या मोठ्या उधाणात समुद्राचे पाणी सुरक्षित ठेवलेल्या होड्यांपर्यंत पोचले.

यात महेश हडकर तसेच त्यांच्या होडी लगत अन्य एका रापण संघाची होडी अशा दोन होड्या जाळ्यांसह लाटांच्या पाण्यात समुद्रात वाहून गेल्या. उधाणाच्या पाण्यात होड्या व त्यातील जाळ्या वाहून जात असल्याचे स्थानिक रापणकर मच्छीमारांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोरीच्या साहाय्याने होड्यांना बांधून अथक परिश्रमाने या दोन्ही होड्या समुद्रातून बाहेर काढण्यात आल्या. यात दोन्ही होड्यांचे तसेच जाळ्यांचे मिळून सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major damage to boats due to flooding