मालवण : माशांच्या अन्नसाखळीवर संकटाचे सावट

किनाऱ्यावरील तेलगळती; ठोस उपाय योजण्याची अपेक्षा
fish
fishsakal

मालवण : देवगड ते विजयदुर्ग येथील खोल समुद्रात अपघातग्रस्त बनलेल्या ‘पार्थ’ या तेलवाहू जहाजातील तेलगळतीमुळे जिल्ह्याच्या किनारपट्टी भागास धोका निर्माण झाला आहे. सागरी प्रदूषणामुळे माशांचे अन्न असलेल्या प्लवंगांना धोका निर्माण होऊन माशांची अन्नसाखळी बाधित होण्याची भीती जिल्ह्यातील मच्छीमारांना वाटत आहे. असे झाल्यास मासेमारीवर संकट ओढवेल असे त्यांना वाटते. शासनाने अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून हे संकट तत्काळ दूर करावे, अन्यथा आम्हाला शासनाच्या विरोधात जोरदार लढा उभारावा लागेल, असा इशारा पारंपरिक मच्छीमारांनी दिला आहे.

सात दिवसांपूर्वी विजयदुर्ग येथील समुद्रात पार्थ हे तेलवाहू जहाज अपघातग्रस्त बनले. या जहाजावर मोठ्या प्रमाणात असलेल्या तेलामुळे तेलगळतीची समस्या निर्माण झाली आहे. या तेलगळतीचे परिणाम देवगडसह मालवण, वेंगुर्ले किनारपट्टीस मोठ्या प्रमाणात जाणवणार आहेत. प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही सुरू झाली असली तरी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या तेलगळतीमुळे मच्छीमार, पर्यटन व्यावसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची भिती वाटत आहे.

या संदर्भात ‘सकाळ’ने मच्छीमार व संबंधितांची मते जाणून घेतली. श्रमिक रापणकर मच्छीमार संघाचे सचिव दिलीप घारे म्हणाले, ‘‘जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात अपघातग्रस्त पार्थ जहाजातील तेलगळती होणार आहे. या समस्येकडे शासनाने गांभीर्याने पाहून तत्काळ प्रभावी उपाययोजना राबविणे गरजेचे बनले आहे. सागरी जैवविविधतेच्या दृष्‍टिकोनातून या तेलगळतीचा परिणाम हा प्लवंगावर होणार आहे. प्लवंग, जीवाश्म जगले तरच मासेमारी व्यवसाय जगणार आहे. या प्लवंगावरच मासळीची अन्नसाखळी अवलंबून आहे. जर मोठ्या प्रमाणात ही तेलगळती वाढली तर मोठा धोका हा प्लवंगांना होणार आहे. पर्यायाने मासेमारीची अन्नसाखळी बिघडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने मासेमारीची अन्नसाखळी असलेले प्लवंग वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गेल्या दोन महिन्यात वादळसदृश परिस्थितीचा मच्छीमारांना सामना करावा लागत असून अद्यापही मासेमारी पूर्वपदावर आलेली नाही. यात आता या अपघातग्रस्त जहाजातील तेलगळतीमुळे मासेमारी व्यवसायास फटका बसणार आहे. प्रशासनाकडून जे उपाय सुरू आहेत ते तात्पुरते स्वरूपाचे आहेत. खरेतर ज्यावेळी हे जहाज बुडाले त्याचवेळी हायड्रोलिक ड्रेझिंग सिस्टीमद्वारे तेलगळती होऊ नये यासाठी उपाय करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात आजही ही उपाययोजना राबविण्याची कार्यवाही केलेली नाही. शासनाने केवळ किनारपट्टी भागात प्रात्यक्षिके न दाखविता प्रत्यक्ष घटनास्थळी जात तेथील तेल काढण्याची कार्यवाही केली असती तर तेलगळती रोखण्यास मदत मिळाली असती आणि धोका टळला असता. अजूनही समुद्रातील वातावरण निवळलेले नसून पुन्हा वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास या तेलगळतीचा मोठा परिणाम जिल्ह्याच्या किनारपट्टी भागास बसणार आहे.’’

श्रमिक मच्छीमार संघाचे रविकिरण तोरसकर म्हणाले, ‘‘समुद्रात अपघातग्रस्त जहाजातून तेलगळतीची जी भीती मच्छीमारांनी व्यक्त केली होती ती खरी ठरली आहे. हे निसर्गनिर्मित संकट नसून मानवनिर्मित आहे. आता सगळ्या प्रशासकीय यंत्रणा, विविध सामाजिक संस्था यांनी यात पुढाकार घेत समुद्रातील हे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांचा समन्वयच नसल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे या दुर्घटनेचे गांभीर्य वाढले आहे. हायड्रोलिक ड्रेझिंगद्वारे प्रशिक्षित पाणबुड्या सोडून तेल बाहेर काढणे गरजेचे आहे. या तेलगळतीचा मासेमारीसह पर्यटनावर मोठा परिणाम होण्याची भीती आहे. मत्स्यव्यवसाय खाते, मेरीटाईम बोर्डचे अधिकारी, नौदलाचे तंत्रज्ञ, सीएमएफआरआय, मत्स्यव्यवसाय महाविद्यालयाच्या व्यक्ती, एनआयओ संस्था, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी एक पथक तयार करून प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन नेमकी काय परिस्थिती आहे याची पाहणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर भविष्यात समुद्रात अशी दुर्घटना घडू नये यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. रिफायनरी व्हावी की न व्हावी या वादात न पडता त्यासाठी जी यंत्रणा लागते तशाप्रकारची अत्याधुनिक यंत्रणा जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात उभी व्हायला हवी. पार्थ या जहाजामुळे एक धडा मिळाला आहे. अशा दुर्घटना घडल्यास काय करायला हवे यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काय चालले आहे, याचा अभ्यास व्हायला हवा.’’

दरम्यान आज प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संदीप भुजबळ यांच्या आदेशानुसार येथील बंदर निरीक्षक यु. आर. महाडिक, सहायक बंदर निरीक्षक अरविंद परदेशी यांनी आमदार वैभव नाईक, हरी खोबरेकर, बाबी जोगी, रविकिरण तोरसकर, दिलीप घारे, गणेश कुडाळकर, सन्मेश परब, मंदार केणी, नरेश हुले यांच्यासह स्थानिक मच्छीमारांच्या उपस्थितीत येथील समुद्रकिनारी तेलगळतीच्या पार्श्‍वभूमीवर प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी किनाऱ्यावर तेल आल्यास भुशाच्या वापर करून ते एकत्र करून ते नष्ट कसे करायचे याची माहिती बंदर निरीक्षक श्री. महाडिक यांनी दिली. यावेळी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या तेलगळतीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात भुसा कोठून आणायचा असा प्रश्‍न उपस्थित केला असता मेरीटाईम बोर्डाच्यावतीने भुसा उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे श्री. महाडिक यांनी स्पष्ट केले.

पर्यटनालाही चिंता

पार्थ जहाजातील तेलगळती सुरू झाली असली तरी अद्याप ती जिल्ह्याच्या किनाऱ्यापर्यत पोचलेली नाही. सध्या केवळ डांबरसदृश थर किनाऱ्यावर पोचला असल्याचे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी सांगितले. तेलगळती रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. या तेलगळतीचा परिणाम मासेमारीसह, पर्यटनावर होणार असल्याने मच्छीमारांबरोबरच पर्यटन व्यावसायिकांच्या चिंतेत वाढ झाली असल्याचे किनारपट्टी भागात दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com