esakal | कर्करोगाशी तडफेने लढणाऱ्या मालवणी अभिनेत्रीची आव्हान पेलण्यासाठी आर्त साद...
sakal

बोलून बातमी शोधा

०

सध्या त्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर मुंबई-चर्नीरोड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

कर्करोगाशी तडफेने लढणाऱ्या मालवणी अभिनेत्रीची आव्हान पेलण्यासाठी आर्त साद...

sakal_logo
By
दीपेश परब

वेंगुर्ले  (जि. सिंधुदुर्ग) : मालवणी नाट्यक्षेत्राची आयुष्यभर सेवा करणाऱ्या गीतांजली लवराज कांबळी आज कर्करोगाशी लढा देत आहेत. पैशांअभावी त्यांचा लढा दुबळा ठरण्याची भीती आहे. लॉकडाउनमुळे ही स्थिती ओढवली आहे. 

सध्या कोरोनामुळे शूटिंग ठप्प आहेत. नाटकांचे दौरे बंद आहेत. कलाकारांना काम नाही. परिणामी बहुतांश कलाकार आर्थिक संकटात आहेत. मालवणी भाषा, मालवणी नाटक याला खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार पोचवले ते ज्येष्ठ कलाकार मच्छिंद्र कांबळी यांनी. त्यांच्या सोबत काम केलेल्या तसेच "सही रे सही' नाटक फेम गीतांजली लवराज कांबळी यांच्यासाठी हे कोलमडलेले अर्थकारण जीवन-मरणाशी लढा देणारे ठरत आहे. सध्या त्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर मुंबई-चर्नीरोड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पती तथा ज्येष्ठ कलावंत लवराज कांबळी यांच्यासमोर त्यांच्यावरील उपचारांचे आव्हान आहे. 

"सही रे सही' या नाटकात अभिनेते भरत जाधवबरोबर गीतांजली यांनी केलेला अभिनय आजही प्रेक्षक विसरले नाहीत. त्यांनी विविध मालिकांमध्येही काम केले. "बकुळा नामदेव घोटाळे', "टाटा बिर्ला आणि लैला' व "गलगले निघाले' या चित्रपटांमधील त्यांची कामे प्रेक्षकांनी खूप पसंत केली. गीतांजली यांनी 50 पेक्षा जास्त व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले. त्यांचे पती लवराज हेही नाट्यक्षेत्रातील नावाजलेले कलावंत आहेत. गीतांजली यांच्या जीवनावर लवराज यांनी "बायको खंबीर; नवरो गंभीर' या मालवणी नाटकाचीही निर्मिती केली. 

गीतांजली यांना 2012 पासून कर्करोगाने ग्रासले. त्याच्याशी सामना करत पुन्हा अनेक नाटके, चित्रपट व मालिकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांच्यावर आतापर्यंत 40 केमो झाले आहेत; परंतु पुन्हा एकदा या आजाराने डोके वर काढले आहे. यातच नाटकं बंद आहेत. उपचाराचा खर्च वाढत आहे. कांबळी कुटुंब मूळ मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील आहे. हेत. 

मी अनेक मालवणी नाटकात काम केले. अनेक मालवणी कलाकार घडवले. काम सुरू असताना कोणाकडे आर्थिक मदतीसाठी हात पुढे केले नाही; मात्र आता मी कर्करोगाने त्रस्त आहे. जीवनाच्या या टप्प्यावर खूप संघर्ष करावा लागत आहे.
- गीतांजली कांबळी, ज्येष्ठ कलावंत 

"गोप्या'साठी पडदा उघडा 
ज्येष्ठ कलावंत तथा गीतांजली यांचे पती लवराज कांबळी म्हणाले, ""आता खऱ्या अर्थाने "गोप्या'साठी कोकणी माणसाने पडदा उघडण्याची गरज आहे. मच्छिंद्र कांबळी आणि मी म्हणजेच तात्या आणि गोप्या यांनी मालवणी भाषेतून सर्व रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मला या सर्व प्रवासात मदत करणारी आणि माझ्या सोबतच मालवणी भाषेतून अनेक नाटके करून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या गीतांजलीचीच स्थिती आज बिकट आहे. सुरुवातीपासून राज ठाकरे, भरत जाधव, मित्रपरिवार यांनी मदत केली; मात्र आता लॉकडाउनमुळे माझेही सर्व प्रयोग, नाटक दौरे बंद आहेत. आर्थिक स्थिती कोलमडून गेली आहे. त्यातच गीतांजलीला सुमारे 50 हजार पर्यंतचा केमो द्यावा लागतो.'' 

संपादन : विजय वेदपाठक