सिंधुदुर्गातील `हे` उपजिल्हा रुग्णालय नॉन कोविड हवे; अन्यथा मनसे करणार आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 August 2020

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोविड आणि नॉन कोविड सेंटरमध्ये सेवा करावी लागते. यात उपजिल्हा रुग्णालयात इतर आजारांवर उपचार करून घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचा जीव धोक्‍यात येत आहे.

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - कणकवली शहरात एक कोविड सेंटर अस्तित्वात आहे. तर आणखी एका ठिकाणी कोविड सेंटर तयार केले जात आहे. त्यामुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालय केवळ नॉन कोविड सेंटर म्हणूनच वापरावे तसेच येथे कोणत्याही रुग्णांचे स्वॅब घेण्यात येऊ नयेत. तसेच या रुग्णालयातील डॉक्‍टर्स व नर्सेसना कोविडसंबंधी कोणतीही कामगिरी देऊ नये. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

श्री. उपरकर यांनी म्हटले की, कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोविड आणि नॉन कोविड सेंटरमध्ये सेवा करावी लागते. यात उपजिल्हा रुग्णालयात इतर आजारांवर उपचार करून घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचा जीव धोक्‍यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या एका कोविड रूग्णामुळे एक डॉक्‍टर, दोन नर्सेस, दोन तांत्रिक तर एक अन्य कर्मचारी आणि पाच इतर रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर पुढील काळात अन्य रूग्णालयीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली तर उपजिल्हा रुग्णालय बंद करण्याची वेळ येऊ शकते.

कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे नॉन कोविड असल्याने रुग्णालयातील डॉक्‍टर व नर्सिंग स्टाफने कोविड रुग्ण तपासू नयेत. यातून इतरांना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्व खोल्यांचे निर्जंतुकीकरण करून शासनाने व कोविड 19 च्या आयसीएमआरच्या नियमावलीनुसार हॉस्पिटलची निगा राखण्यात यावी. या रुग्णालयात स्वॅब घेऊ नयेत तसेच डॉक्‍टर व स्टाफला कोविडची कामगिरी देऊ नये. तसे न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

- परशुराम उपरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manase Demand Non Covid Center In Kankavali Sub District Hospital