मंडणगडच्या कलाकारांनी शॉर्टफिल्ममधून बिंबवले कोरोनाचे 'गांभीर्य' 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

ध्रुवतारा क्रिएटर्स आणि एन. डी. प्रोडक्‍शन प्रस्तुत "गांभीर्य' शॉर्ट फिल्मचे संकलन, लेखन आणि दिग्दर्शन अनिकेत नाचणेकर यांचे आहे. डी. ओ. पी. मितेश गायकवाड तर एडिटर नदीम देवळेकर हे आहेत.

मंडणगड ( रत्नागिरी ) - कोरोनाचा प्रादुर्भाव आता शहरातून गावात पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने बनविलेल्या "गांभीर्य' या शॉर्ट फिल्मने कोरोनाचे गांभीर्य बिंबवण्याचे काम केले आहे. मंडणगड तालुक्‍यातील स्थानिक कलाकारांनी ही शॉर्ट फिल्म निर्माण केली असून, सोवेली गावात तिचे चित्रीकरण केले. या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होतेय. 

ध्रुवतारा क्रिएटर्स आणि एन. डी. प्रोडक्‍शन प्रस्तुत "गांभीर्य' शॉर्ट फिल्मचे संकलन, लेखन आणि दिग्दर्शन अनिकेत नाचणेकर यांचे आहे. डी. ओ. पी. मितेश गायकवाड तर एडिटर नदीम देवळेकर हे आहेत. आनंदी नागरगोजे, पंकज चव्हाण, राज सुगदरे आणि दत्तप्रसाद गांगण या स्थानिक कलाकारांनी काम केले असून, आपल्या अभिनयाने सामाजिक प्रबोधन केले आहे. सोवेलीचे सरपंच सुरेश दळवी, संपत शिंदे, राहुल साळवी, प्रथमेश घोसाळकर, बालाजी नागरगोजे, हृतिक कदम यांचे सहकार्य लाभले आहे.

21 सप्टेंबरला ही फिल्म प्रसारित केली असून दोन दिवसात हजारो नागरिकांनी ही फिल्म पाहिली आहे. अनेक महिन्यांपासून लॉकडाउन चालू आहे. त्याची झळ ग्रामीण भागातही पोहचली आहे;लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करीत असतात, त्यामुळे मोठ्यांनी योग्य वर्तवणूक ठेवून आपला आदर्श मुलांसमोर उभा करावा, असा संदेश अभिनय व संवादाच्या माध्यमातून दिला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandangad Actors Creats Short Film On Corona Seriousness