पशुधनाचे ''ईअर टॅगिंग'' बंधनकारक

पशुधनाचे ''ईअर टॅगिंग'' बंधनकारक

84039

पशुधनाचे ‘ईअर टॅगिंग’ बंधनकारक
किशोर तावडेः १ जूनपासून काटेकोर अंमलबजावणीचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १६ः प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियत्रंण अधिनियमानुसार जिल्ह्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर १ जूनपासून बंधनकारक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहेत.
केंद्राच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे ‘नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन’ (एनडीएलएम) भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमध्ये ईअर टॅगिंगच्या (१२ अंकी बार कोड) नोंदी घेण्यात येत आहेत. यामध्ये जन्म-मृत्यू नोंदणी प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तातंरण यांचा समावेश आहे. या प्रणालीमध्ये संबंधित पशुधनाची प्रजनन आरोग्य मालकी हक्क, जन्म-मृत्यू, ही सर्व माहिती उपलब्ध होते. त्याकरिता सर्व पशुधनास कानात ‘टॅग’ (बिल्ला) लावून त्यांची भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांमार्फत पशुधनास कानात टॅग लावून त्यांची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.
राज्यातील सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता तसेच प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर १ जूनपासून बंधनकारक करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत, नगरपरिषद यांनी १ जूननंतर ईअर टॅगिंगशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था अथवा दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा देऊ नये, जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देऊ नये, सर्व महसूल, वन, महावितरण यांनी नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देऊ नये. कोणत्याही पशुधनाची वाहतूक ''ईअर टॅग'' असल्याशिवाय करता येणार नाही. परराज्यातून येणाऱ्या पशुधनास ईअर टॅगिंग केल्याची व त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खातरजमा तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी करून त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेण्यात यावी, असे या आदेशात म्हटले आहे.

चौकट
खरेदी-विक्री, शर्यत, वाहतुकीवर निर्बंध
१ जूननंतर बाहेरच्या राज्यातून राज्यात पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंगशिवाय करता येणार नाही. ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावागावांतील खरेदी-विक्री व बैलगाडा शर्यत करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. ईअर टॅग नसलेल्या पशुधनास बाजार समितीमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये व त्यांची खरेदी-विक्री होणार नाही, याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यावी. ग्रामपंचायतीमध्ये पशुंच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची ईअर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येऊ नये. दाखल्यावर ईअर टॅगचा क्रमांक नमूद करण्यात यावा. या शासन निर्णयाची अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस, वन, महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत), उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व अनुषंगिक प्रशासकीय विभागांनी काटेकोरपणे करावी, असे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com