जर्मन पर्यटकांकडून मांडवी किनाऱ्याची सफाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

सोमवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही या दोघांचा सन्मान केला. त्यांना मदत करणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी व हॉटेल सी फॅन्सच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. दोन्ही पर्यटक मांडवी किनाऱ्यावरील सी फॅन्स हॉटेलमध्ये आले होते.

रत्नागिरी - प्रजासत्ताकदिनी मांडवी किनाऱ्यावर जर्मनीचे पर्यटक फेलिक्‍स वार्गा आणि जेनी क्रिस्ट यांनी स्वच्छता अभियान राबवले आणि दिवसभर त्याचीच चर्चा सुरू होती. त्यांची ही कृती रत्नागिरीकरांच्या डोळ्यात अंजन घालणारीच ठरली. यानिमित्ताने रत्नागिरीकर कधी सुधारणार? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

सोमवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही या दोघांचा सन्मान केला. त्यांना मदत करणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी व हॉटेल सी फॅन्सच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. दोन्ही पर्यटक मांडवी किनाऱ्यावरील सी फॅन्स हॉटेलमध्ये आले होते. किनाऱ्यावर फिरताना दिसलेला कचरा त्यांना स्वस्थ बसू देईना आणि त्यांनी स्वच्छता सुरू केली. भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या या दोन्ही पर्यटकांनी रत्नागिरीकरांच्या डोळ्यात अंजन घातले. हे पर्यटक इथून पुढे गोवा, श्रीलंका, इटली आणि युरोपमध्ये जाणार आहेत. त्याना स्वच्छता करताना पाहिल्यावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अभिजीत गिरकर, सुशील कदम, जयदीप साळवी, गणेश गायकवाड यांनी लगेच त्यांच्यासोबत स्वच्छतेला सुरवात केली. हॉटेलचे मॅनेजर कांचन आठल्ये यांनीही हे लगेचच सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन या अभियानात सक्रिय भाग घेतला. 

या विषयाची नोंद घेत जिल्हाधिकाऱ्यांनी विदेशी पाहुण्यांचे आभार मानले. त्यांच्यासोबत गप्पा मारत चहापाण्याची विनंती केली. रोटरी क्‍लब मिडटाऊनने मांडवी किनाऱ्यावरील भेळपुरी, पाणीपुरी व्यावसायिकांना डस्टबिन वाटप केले. या वेळी ऍड. विनय आंबुलकर, दिगंबर मगदूम, समीर इंदुलकर, केदार माणगावकर, जयंतीलाल जैन, जयेश दिवाणी, हिराकांत साळवी, गणेश जोशी, अभिजित सुर्वे, निशिकांत वारंग, कौस्तुभ सावंत, मांडवी ग्रामस्थ उपस्थित होते. 

कचरा साफ करण्याची सर्व जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असे म्हणत सुशिक्षितही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतात. ही मानसिकता बदलायला हवी. परदेशी पर्यटक रॅपर्स, कचरा टाकण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी व्यवस्था नसेल तर ते फेकून न देता आपल्याजवळ ठेवतात. कचराकुंडीत टाकतात. हे आपण कधी शिकणार? प्रशासन दंड आकारत नाही. 
- केशव भट, सामाजिक कार्यकर्ते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandavi Beach Cleaning By German Tourists Ratnagiri Marathi News