हंगामाच्या सुरवातीलाच आंबा हजार रुपयांनी घसरला 

राजेश कळंबटे - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 6 मार्च 2017

रत्नागिरी - हापूस उशिराने मार्केटमध्ये दाखल झाला; मात्र गतवर्षीपेक्षा यावर्षी पेटीचा दर 1 हजार रुपयांनी घसरला आहे. हंगामाच्या सुरवातीलाच दर कमी मिळाल्याने कोकणातील बागायदार चिंताग्रस्त झाला आहे. गतवर्षी पेटीला चार हजार रुपयांपर्यंत दर होता, तर यावर्षी तीन हजार रुपये मिळत आहेत. दर स्थिर राहण्यासाठी काही दिवसांपूर्वी रत्नागिरीमध्ये वाशीतील दलाल आणि स्थानिक बागायतदार यांची बैठक झाली; मात्र दर समाधानकारक न मिळाल्याने ती बैठक विफल ठरल्याची भावना बागायतदारांमध्ये बळावत आहे. 

फेब्रुवारीअखेरीस अचानक पारा वर चढल्याने उन्हाचे चटक बसू लागले आहेत. उष्मा वाढल्याने आंबाही वेगाने तयार होऊ लागला. गेल्या पंधरा दिवसांमध्ये रत्नागिरी, देवगडमधून पेट्या वाशीतील बाजारात पाठविण्यास सुरवात झाली. ताप वाढल्यानंतर त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. हापूसपाठोपाठ कर्नाटक, तमिळनाडूतील आंबाही वाशीत मोठ्या प्रमाणात येत आहे. हापूसच्या पेट्यांची संख्या साडेनऊ हजारांवर पोचली आहे. कर्नाटकी आंब्याच्या 3,616 पेट्या बाजारात येतात. त्याचा फटका हापूसच्या दराला बसला आहे. सुरवातीला पेटीचा दर 4 हजार ते 6 हजार रुपये होता. पंधरा दिवसांनी या दरात घसरण झाली. आता पेटीला तीन हजार रुपयेच मिळत आहे. गतवर्षी याचवेळी एक हजार रुपयांनी दर वधारलेले होते; पण यावर्षी दर घसरल्याने चिंता वाढली आहे. 

हापूसला बाजारात उठाव नसल्याने दर घसरल्याचे कारण दिले जात आहे. दरवर्षी ही परिस्थिती उद्‌भवत नाही; परंतु याचवर्षी हा गोंधळ सुरू झाल्याने बागायतदारांपुढील अडचणी वाढल्या आहेत. गल्फ देशातील निर्यात सुरू असल्याने एवढा दर मिळतोय, असे वाशीतून सांगितले जात आहे. दर स्थिर ठेवण्यासाठी वाशीतील दलालांची बैठक घेण्यात आली होती. त्या वेळी वाशीचे संचालक संजय पानसरे यांनी दराबाबत बागायतदारांना आश्‍वासन दिले होते. सद्यःस्थिती पाहता बागायतदारांपुढे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दलाली बंदच्या शासन निर्णयानंतर आंबा बाजारात दाखल होत आहे. त्याचा दरावर परिणाम झाल्याची चर्चा सुरू आहे. 

शासन निर्णयानुसार दहा टक्‍के दलाली बागायतदारांकडून घेतली जात नाही. दलाली न घेतल्याने आदान-प्रदानातील व्यवहार चालविताना दलालांची कसरत सुरू आहे. त्याचा परिणाम दरावर होण्याची शक्‍यता आहे. 

सुरवातीला पेटीला साडेचार हजार ते पाच हजार रुपये दर मिळाला होता. आता दर कमी झाला आहे. उत्पादन खर्च वाढल्याने पुरेसा दर मिळाला नाही, तर बागायतदारांची पंचाईत होणार आहे. वाशीत रत्नागिरी हापूसची आवक म्हणावी तेवढी नाही, तरीही समाधानकारक दर मिळालेला नाही. 
- तुकाराम घवाळी, बागायतदार. 

Web Title: mango rate down