Sindhudurga : आंबा हंगाम अनिश्चिततेकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबा हंगाम अनिश्चिततेकडे

आंबा हंगाम अनिश्चिततेकडे

sakal_logo
By
संतोष कुळकर्णी

देवगड : अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांसह अन्य फळपीक घेणारे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. पावसाचा मुक्काम लांबल्याने वातावरणात झालेल्या प्रचंड बदलाचे परिणाम यंदाच्याही आंबा हंगामावर उमटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या बागायतदारांच्या आर्थिक समस्यांमध्ये आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

मागील हंगामाची अखेर आणि यंदाच्या हंगामाची सुरूवात खडतर झाली. यंदा १५ मेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाल्याने आंबा हंगाम अकाली संपला. वादळाबरोबरच सलग तीन दिवस पाऊस झाल्याने फळपिकाचे दर गडगडले. वादळामुळे अनेकांचा आंबा झाडावरून पडल्याने नुकसानीची तीव्रता वाढली. फळबाजारातील आवक मंदावण्याबरोबरच आंब्याची मागणी घटल्याने उर्वरित आंबा प्रक्रिया उद्योगाकडे वळवण्यावाचून पर्याय नव्हता. त्यानंतर माॅन्सूनचा हंगाम चांगला गेल्याने मशागतीने वेग घेतला. आता बागांची साफसफाई करण्याचे काम सुरू होते. झाडावर मोहोर दिसू लागल्याने फवारणीची सुरूवात झाली होती. यंदाच्या हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या असतानाच अचानक परतीच्या पावसाने बागायतदारांना दगा दिला. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह गेले आठ ते दहा दिवस जिल्ह्याच्या विविध भागात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. त्यामुळे आशेने फवारणी केलेल्या बागायतदारांचा खर्च वाया गेला आहे.

अलीकडे इंधन दरवाढीमुळे वाहतुक भाड्यात मोठी वाढ झाल्याने कीटकनाशके, संजीवके यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे फवारणी वाया गेली असली तरीही झाडावरील तुरळक मोहोर टिकवण्यासाठी

बागायतदारांची पुनर्फवारणीची धडपड सुरू आहे. सतत कोसळणार्‍या अवकाळी पावसामुळे झाडे मोहोरण्याऐवजी झाडांना पुन्हा पालवी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास यंदाचा हंगाम लांबण्याचे स्पष्ट संकेत मानता येतील. यामुळे बागायतदारांचा खर्च आणखीनच वाढणार आहे. सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा अनुभव बागायतदार घेत आहेत. पाऊस पूर्णपणे थांबून दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडी असे वातावरण आंबा, काजू कलमे मोहोरण्यासाठी पोषक मानता येते; मात्र तोपर्यंत बागायतदारांचा फवारणी खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पावसाने बागांमध्ये पुन्हा रान वाढल्याने त्यासाठी खर्च करावा लागणार आहे.

इंधन दरवाढीचाही आर्थिक गणितावर प्रभाव

इंधन दरवाढीचा फटका वाहन चालकांबरोबरच आंबा, काजू बागायतदारांनाही बसला आहे. आधुनिक यंत्रणेमुळे फवारणी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या यंत्रासाठीच्या इंधनाचे दर कमालीचे वाढल्याने फवारणी खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यातच मजुरीचे दरही वाढल्याने एकूणच उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे एकीकडे वाढत्या व्यवस्थापन खर्चामुळे अडचणीत सापडलेल्या बागायतदारांना आता अवकाळी पावसाचा दणका बसत आहे.

"अवेळी पावसामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. अपेक्षित थंडी पडली तर मोहोराचे प्रमाण वाढेल. मात्र सध्याच्या हवामानामुळे किडरोगाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने आंबा बागायतदार शेतकर्‍यांना फवारणीचे योग्य नियोजन करावे लागेल. आधीचा मोहोर टिकला तर उत्पादन वेळेत येईल अन्यथा झाडांना पालवी फुटून हंगाम लांबण्याची शक्यता आहे."

- किरण मालशे,

सहयोगी प्राध्यापक,

उद्यानविद्या महाविद्यालय दापोली

"यंदा झाडांना चांगला मोहोर आला होता. यातून चांगले उत्पादन मिळण्याची शेतकर्‍यांना आशा होती; मात्र अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे मोहोरावर बुरशीजन्य प्रादुर्भाव वाढून मोहोर काळवंडला. यासाठी महागडी औषधे फवारूनही त्याचा म्हणावा तसा परिणाम जाणवला नाही. सायंकाळी पाऊस होत असल्याने रात्रभर मोहोरावर पाणी साचून त्याचा परिणाम झाला. ढगाळ वातावरण आणि सतत पाऊस झाल्याने फवारणीचा खर्च वाढला. यातून बागायतदारांचे नुकसान झाले."

- रूपेश पारकर, प्रयोगशील आंबा बागायतदार, वरेरी (देवगड)

loading image
go to top