मराठा समाजाकडून कुडाळ तहसीलदार धारेवर 

अजय सावंत
Tuesday, 29 September 2020

सकल मराठा समाजाच्यावतीने 23 हजार 107 लोकांनी स्वाक्षरी करून निवेदन दिले.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज तालुक्‍यातील मराठा समाज बांधवांनी तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. तालुक्‍यातील स्थानिक प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मराठा समाजाने तहसीलदारांना धारेवर धरले. एकूणच जिल्हा प्रशासनाने आंदोलनाकडे कानाडोळा केला म्हणून तालुका व जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यात आला. 

जिल्ह्यात 65 टक्के मराठा समाज आहे. आज आंदोलनाबाबत निवेदन स्वीकारताना कसलीही व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली नाही. जिल्ह्यातील खासदार, आमदार मराठा समाजाचे असताना जिल्हा प्रशासनाने मराठा समाजाला वाऱ्यावर सोडले, अशी संतप्त प्रतिक्रीया यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.

सकल मराठा समाजाच्यावतीने 23 हजार 107 लोकांनी स्वाक्षरी करून निवेदन दिले. तहसीलदार अमोल पाठक यांनी हे निवेदन स्वीकारले. जिल्हा प्रशासनाने मराठा आंदोलनाकडे गांभीर्याने पहावे नाहीतर मराठा समाज गांभीर्याने बघेल. त्यावेळी "पळता भुई थोडी' होईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा जिल्हा समन्यवक सुहास सावंत यांनी दिला. न्याय मागण्यांसाठी लवकरच जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक होईल, असेही ते म्हमाले. यावेळी अमरसेन सावंत, प्रभाकर सावंत, सचिन काळप, राजू राऊळ, बंड्या सावंत, संग्राम सावंत, विजय सावंत, अभि गावडे, शैलेश घोगळे, ज्ञानेश्‍वर आळवे आदी उपस्थित होते. 

काय झाला वाद? 
ऍड. सावंत यांनी तहसीलदार पाठक यांना खडेबोल सुनावले. ते म्हणाले, ""हा मराठा समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. प्रशासन 65 टक्के इतक्‍या संख्येने असलेल्या या समाजाचा विचार करत नसेल तर चुकीचे आहे. यापुर्वी प्रशासनाकडून चांगले सहकार्य मिळाले. पुर्वीच्या पालकमंत्र्यांनीही मदत केली. ते आंदोलनाआधी संवाद साधायचे. यावेळी दुर्दैवाने प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही. तुम्ही अधिकारी असला तरी जनसेवक आहात. तुमची वाट बघावी लागते, हे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री-समाजातील दुवा आहात; मात्र तुमच्या कार्यपद्धतीचा निषेध. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha community is aggressive in Kudal taluka