चिपी विमानतळ कामांना मार्चची "डेडलाईन'  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

March Deadline For Chipi Airport Works Sindhudurg Marathi News

चिपी विमानतळ (ता.वेंगुर्ले) अनेक अडथळ्याच्या शर्यतीत अडकले होते. 2014 मध्ये आलेल्या भाजप- शिवसेना युती शासनाच्या काळात या प्रकल्पाला गती आली.

चिपी विमानतळ कामांना मार्चची "डेडलाईन' 

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - चिपी विमानतळाची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी नागरी उड्डाण महासंचालनालयाने विकासक असलेल्या आयआरबी कंपनीला येत्या मार्चपर्यंतची डेडलाईन दिली आहे. या मुदतीत कामे पुर्ण झाली तरच नागरी उड्डाण महासंचालनालयाचे (डिजीसीए) संयुक्त तपासणी पथक तपासणीसाठी येईल आणि त्यानंतरच विमानतळ कामाच्या दर्जावर डिजीसीए उड्डाणासाठी परवानगी देईल असे केंद्राचे नागरी उड्डाण राज्यमंत्री हरदीप एस.पुरी यांनी स्पष्ट केले आहे. तसे त्यांनी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनाही कळविले आहे. 

चिपी विमानतळ (ता.वेंगुर्ले) अनेक अडथळ्याच्या शर्यतीत अडकले होते. 2014 मध्ये आलेल्या भाजप- शिवसेना युती शासनाच्या काळात या प्रकल्पाला गती आली. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकारातुन 12 सप्टेंबर 2018 मध्ये विमानतळाचे टेस्ट लॅंन्डिंग झाले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे उद्‌घाटन सुध्दा झाले; पण नियमित विमानसेवा काही सुरू झाली नाही. लोकप्रतिनिधी मात्र नियमित विमान सेवेच्या तारखा देत होते; पण त्यांना मुर्त स्वरूप येत नव्हते. 

हेही वाचा - बांदा उपसरपंचपदी भाजपचे हर्षद कामत 

याप्रश्‍नी खासदार राऊत यांनी राज्य, केंद्र स्तरावर पाठपुरावा सुरूच ठेवला होता. 19 नोव्हेंबर 2019 ला खासदार राऊत यांनी नागरी उड्डाण मंत्री हरदीप एस.पुरी यांना चिपी विमानतळ लवकरच कार्यान्वित व्हावे, यासाठी संबंधित विभागांची बैठक घ्यावी अशी विनंती केली होती. त्याची दखल घेत मंत्री पुरी यांनी दिल्लीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

या वेळी भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय), नागरी उड्डाण महासंचालनालय (डिजीसीए), नागरी उड्डाण ब्युरो ( बीसीएएस), महाराष्ट्र औद्योगिक विकास कॉरपोरेशन (एमआयडीसी) आणि आयआरबी सिंधुदुर्गचे अधिकारी उपस्थित होते. नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) आणि नागरी उड्डाण ब्युरो (बीसीएएस) ने चिपी विमानतळ प्रकल्पाची तपासणी पुर्ण केली असून त्यांच्या तपासणीत काही त्रुटी आढळल्या. त्या पुर्ण करण्याच्या सुचना आयआरबी कंपनीला दिल्या होत्या; पण त्यांनी त्या सुचनाचे पालन केले नाही, असे या बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा - अबकी बार सिर्फ रोजगार यावर अजित अभ्यंकर म्हणाले, 

त्यानंतरच ग्रीन सिग्नल 

आता मार्चपर्यंत चिपी विमानतळाच्या विकासक आयआरबी कंपनीने प्रलंबित असलेली सर्व कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. ती कामे पुर्ण झाल्यानंतर नागरी उड्डाण महासंचालनायाचे संयुक्त पथक चिपी विमानतळ प्रकल्पावर तपासणीसाठी येणार आहे. त्यानंतरच विमान वाहतुकीला ग्रीन सिग्नल मिळेल, असे मंत्री पुरी यांनी खासदार राऊत यांना पत्राने कळविले आहे. 

टॅग्स :Shiv SenaSindhudurg