esakal | वॉटर स्पोर्टस्‌वर मेरीटाईमचा दंडुका
sakal

बोलून बातमी शोधा

Maritime Board took action and banned

कोरोनाचे कारण; चालकांमध्ये नाराजी; १७ स्पीडबोटी, ५ वॉटर स्कूटर बंद

वॉटर स्पोर्टस्‌वर मेरीटाईमचा दंडुका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: कोरोनाचे कारण देत रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर वॉटर स्पोर्टस्‌ सुरू करणाऱ्या व्यावसायिकांवर अचानक मेरीटाईम बोर्डाने कारवाई करत बंदी घातली. बंदी घातल्याने वॉटरस्पोर्टस्‌ चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्‍त केली जात आहे. गणपतीपुळेसह जिल्ह्यातील १७ स्पीड बोटींसह ५ वॉटर स्कूटर चालकांना फटका बसला.
 

गणपतीपुळेत १७ बोटी असून ५ स्कूटरचालक आर्थिक अडचणीत सापडले. नोव्हेंबर महिन्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर शासनाने मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडले. कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर प्रचंड गर्दी झाली आहे. त्याचा फायदा घेऊन बिघडलेली आर्थिक घडी सुधारण्याची संधी व्यावसायिकांना मिळाली आहे. गणपतीपुळेत वॉटर स्पोर्टस्‌ला सुरवात झाली. पहिल्या चार दिवसांत पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे लाखोची उलाढाल वॉटर स्पोर्टस्‌मधून झाली.

हेही वाचा-सात वर्षांनंतर आई-मुलाची  माऊली कृपेने झाली भेट -

किनाऱ्यांवरील गर्दी पाहता मास्क, सोशल डिस्टन्सिंग या कोरोनातील निकषांचा फज्जा उडाला. याबाबत अलिबागमध्ये तक्रार केली होती. पाण्यात फिरण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या बोटी भरून पर्यटकांना फिरवले जात असल्याचे नमूद केले होते. तेथील प्रशासनाकडून बोटी बंद केल्या. त्यानंतर बुधवारी (ता. १८) रत्नागिरीतही मेरीटाईम बोर्डाकडून बोटी बंद करण्याच्या सूचना दिल्या. दिवाळीनंतर पर्यटन थांबणार असल्यामुळे आताच्या गर्दीचा फायदा व्यावसायिकांना झाला असता. प्रशासनाला किनाऱ्यावरील गर्दीवर नियंत्रण ठेवता आलेले नाही; परंतु वॉटर स्पोर्टस्‌ चालकांवरच बंदी का? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. 

हेही वाचा- नविन वर्षात कर्नाटकात सफर करा आता नविन बसमधून


वॉटर स्पोर्टस्‌ संघटनेने वेधले लक्ष
गणपतीपुळेतील मोरया वॉटर स्पोर्टस्‌ चालकांकडूनही तीव्र नाराजी व्यक्‍त केली. याबाबत कोकणातील वॉटर स्पोर्टस्‌ संघटेनेकडून अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मंदिर सुरू केल्यामुळे गर्दी झाली असून आम्ही लोकांच्या मनोरंजनातून उत्पन्न मिळवत आहोत. पुढील महिन्यात परवानगी दिली तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने पाहावे, असे निवेदनात नमूद केले आहे.

वॉटर स्पोर्टस्‌ सुरू करण्यासाठी अजूनही परवानगी दिलेली नाही. तिथे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी वॉटर स्पोर्टस्‌साठीच्या बोटी बंद 
केल्या आहेत.
- कॅ. संजय उगलमुगल, प्रादेशिक बंदर अधिकारी

संपादन- अर्चना बनगे