
बांदा (सिंधुदुर्ग) - "ना वऱ्हाड, ना वरात दुचाकीवरून थेट घरात' अशा पद्धतीने जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळे पार पाडले जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीजणांनी आपले विवाह सोहळे पुढे ढकलले; मात्र काही जणांनी अगदी साध्या पद्धतीने सर्व नियम पाळून विवाह सोहळे पार पाडत आहेत. इन्सुली येथील स्वप्नील दीपक नाईक व सातार्डा येथील रसिका मनोहर पेडणेकर यांचा विवाह सोहळा शासनाचे सर्व नियम पाळून पार पडला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनचा फटका सर्वानाच बसला आहे. लग्नसराईच्या हंगामात विवाह सोहळेही याला अपवाद नाहीत. शासनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ न देता आज अनोख्या पद्धतीने असाच एक विवाह सोहळा आज येथे चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याला वधू-वरांच्या घरातील कोणीच उपस्थित नव्हते. नवरदेवाचा मित्र आणि भटजी मिळून अवघ्या चार जणांच्या उपस्थितीतच हा सोहळा संपन्न झाला. नवदाम्पत्याची वरात चक्क दुचाकीवरून दारात आली.
लग्न सोहळ्यापूर्वी वधू-वरांनी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची रीतसर परवानगी घेतली होती. यावेळी शासनाच्या नियमांचे पालन केल्यास विवाहाला आपली काहीच हरकत नाही नसल्याचे तहसीलदार म्हात्रे यांनी स्पष्ट केले होते. इन्सुली-गावकरवाडी येथे राहणारा वर स्वप्नील आणि सातार्डा येथे राहणारी वधू रसिका यांचा महिन्याभरापूर्वी लग्न सोहळा ठरला होता. या विवाहाला दोघांच्याही घरच्यांकडून संमती होती. एप्रिलमध्ये हा लग्न सोहळा पार पडणार होता; मात्र अचानक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाउन जाहीर केल्यामुळे हा विवाह सोहळा रखडला होता. त्यातच ऐन लग्नसराईचा हंगाम संपत चालल्यामुळे या वधू-वरांनी शासनाच्या नियमांचे पालन करताना साध्या पद्धतीने विवाह करायचा निर्णय घेतला. दरम्यान, या विवाहासाठी त्यांनी तहसीलदारांकडे रीतसर परवानगीही मागितली होती. यावेळी तहसीलदारांनी फक्त पाच माणसांच्या उपस्थितीत हा विवाह करण्यास हरकत नसल्याचे असे स्पष्ट केले होते.
नियमांचे पालन
या विवाहादरम्यान शासनाने लॉकडाउन काळात जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील, असेही यावेळी सांगितले होते. त्यानंतर वधू-वरांनी तहसीलदारांनी घातलेली अट मान्य करून शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत तोंडाला मास्क बांधून आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून हा सोहळा पार पडला. बांदा येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात हा विवाह संपन्न साध्या पद्धतीने साजरा झाला. यावेळी वधू-वरांच्या दोन्ही कुटुंबीयांकडून तहसीलदार श्री. म्हात्रे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.