esakal | कोकणात या गावाची ओळख आहे नर्सरीचे गाव म्हणून
sakal

बोलून बातमी शोधा

mavlangela village in ratnagiri famous for a nursery village in kokan

कोरडवाहू शाश्‍वत शेती विकास कार्यक्रमातून 2015-16 या आर्थिक वर्षात नर्सरी चालकांना बळ देण्यासाठी कृषी विभागाने अनुदान दिले.

कोकणात या गावाची ओळख आहे नर्सरीचे गाव म्हणून

sakal_logo
By
सुधीर विश्‍वासराव

पावस (रत्नागिरी) : स्वःउत्पन्नाबरोब रच गावातल्या गावात रोजगार निर्मितीचे साधन म्हणून नर्सरी व्यवसायाकडे पाहीले जाते. रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथील सुमारे दहा नर्सरी व्यावसायिकांनी ते दाखवून दिले आहे. कोरडवाहू शाश्‍वत शेती विकास कार्यक्रमातून 2015-16 या आर्थिक वर्षात नर्सरी चालकांना बळ देण्यासाठी कृषी विभागाने अनुदान दिले. त्यामुळे मावळंगेला नर्सरीचे गाव म्हणून ओळख दिली गेली.

 हेही वाचा - जंगलात उंचीवर बांधली झोपडी अन् शिक्षण, नोकरीसाठी त्या दोघी झाल्या ऑनलाईन 


मावळंगेतील अनंत नारायण शिंदे यांनी 1965 साली सर्वप्रथम नर्सरी व्यवसायाला सुरु केला. सुरवातीला लोट्यात माती टाकून कलमे बांधली जायची. दोन ते तीन वर्षांनी त्याला व्यावसायिक रुप प्राप्त झाले. त्यानंतर मावळंगेत सुमारे दहा ते पंधरा नर्सरी व्यावसायीक निर्माण झाले. नर्सरी आणि भातशेतीतून शिंदे यांना 1984 साली कृषी विभागाचा शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला. त्यांच्या नर्सरीमुळे गावातीलच आठ ते दहा कामगारांना नियमित रोजगार मिळाला. नर्सरीतून या गावात उत्पन्नाचे साधन तयार झाले. येथे हापूस, पायरीसह विविध जातींच्या आंब्याची कलमे बांधली जातात. यामध्ये सर्वसाधारणपणे चाळीस टक्के नफा मिळतो. 

दापोली आणि लांजा येथे कृषी विभागाच्या कार्यक्रमात प्रशिक्षण घेऊन अनेकांनी गावातच स्टोनग्राफ कलमे बांधण्यास सुरवात केली. सध्या गावात सुमारे आठ ते दहा नर्सरी व्यावसायिक शिल्लक आहेत. कलमे बांधण्याच्या पध्दती बदलत असून अत्याधुनिक यंत्रणाही आलेली आहे. ऊन, पावसापासून रोपांचा बचाव करण्यासाठी आणि वर्षभर हे काम सुरु रहावे यासाठी तत्कालीन उपविभागिय अधिकारी आरिफ शहा यांनी पुढाकार घेतला. कोरडवाहू शाश्‍वत शेती विकास कार्यक्रमातून 2015-16 या आर्थिक वर्षात नर्सरी चालकांना बळ दिले. 

रोजगार निर्मितीच्या उद्देशाने शेडनेटमध्ये नर्सरीची लागवडीसाठी मावळंगे गावाची निवड केली. चार नर्सरी चालकांना नव्याने परवानेही दिले. मावळंगेत यशस्वीपणे त्याची अंमलबजावणी झाली आणि मावळगेला नर्सरीचे गाव म्हणून ओळख मिळाली. गावातच दिनेश महादेव थुळ यांनी सेंद्रीय खतांचा वापर करुन हापूस, केशर, काजूची कलमे बांधली आहेत. त्याची वाढही उत्तम असून पाच वर्षांनतर उत्पन्नही चांगले येत आहे. वर्षाला दोन लाखाहून अधिक रोपे या गावातून रायगड, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा यासह कर्नाटकात विक्रीला जात आहेत.

 हेही वाचा -  आरोग्य प्रशासनाला मोठा हातभार, जिल्हाधिकाऱ्यांनीही मानले आभार

"नर्सरी व्यावसायातून उत्पन्न चांगले मिळत आहे. अनेक अडचणी येतात. यंदा कोरोनामुळे रोपांचा उठाव कमी झाला. त्यावरही नर्सरीचालक मात करत आहेत. उत्पन्नाबरोबरच रोजगारक्षम असा हा व्यावसाय आहे."

- सुहास अनंत शिंदे, व्यावसायिक

"नर्सरींमुळे फळलागवडीला चालना मिळाली असून पडीक जमिनींवर आंबा, काजूची लागवड झाली. गावातच उत्पन्नाचे साधन तयार झाले."

- माधव बापट, मंडळ कृषी अधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

loading image