शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष भाजपच्या वाटेवर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

भाजपच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी या शिवसैनिकांची भेट घेतली.

रत्नागिरी : शहरातील शिवसेनेचा एक माजी नगराध्यक्ष
भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा ऐन कोजागिरी पौर्णिमेच्या सायंकाळी रत्नागिरी शहरात रंगली होती. भाजपच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी या शिवसैनिकांची भेट घेतली. शहरातील बदलेल्या राजकारणात त्यांच्याकडे सध्या पूर्णतः दुर्लक्ष झाल्यामुळे शिवसेनेला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. 
रत्नागिरी तालुक्यात शिवसेना-भाजप आमने-सामने आलेली असतानाच आता भाजपने शिवसेनेमध्ये सुरूंग लावण्याची सुरुवात केली आहे. 

हेही वाचा - गाळ ठरतोय गरम पाण्याच्या कुंडाचा काळ -

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील शिवसेनेचे एक माजी नगराध्यक्ष भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्ता स्थापनेपासून शिवसेना-भाजप आमने-सामने आली आहे. रत्नागिरी शहरासह तालुका, जिल्ह्यात शिवसेनेचे मोठे प्राबल्य आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका , त्यानंतर येणारी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी भाजपने सुरू केली आहे. मोठे प्राबल्य असलेल्या शिवसेनेतील नाराज नेत्यांना फोडण्याचे काम भाजपने हाती घेतले आहे.

शिवसेनेत नाराज नेत्यांची संख्या काही प्रमाणात आहे . यामध्ये एका माजी नगराध्यक्षांचा ही समावेश आहे. उच्चशिक्षित, अभ्यासू असलेल्या या शिवसेनेच्या तरुण नेत्याला शिवसेनेने आश्चर्यकारकरित्या पदापासून दूर ठेवून त्यानंतर पदावरून काढून टाकले. तेव्हापासून हे माजी नगराध्यक्ष शिवसेनेच्या सक्रिय कार्यक्रमापासून दूर होते. आपली नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त केली नसली तरी त्यांच्या कृतीतून नाराजीचा सूर रत्नागिरीकरांना पाहायला मिळत होता. पदावरून दूर झाल्यानंतर शिवसेनेने केवळ त्यांच्या सन्मानाची घोषणा केली, परंतु शिवसेनेच्या एकाही नेत्याने त्यांची दखल घेतलेली नाही. 

हेही वाचा - भीषण अपघातानंतर युवती कोसळल्या नदीत -

गेले वर्षभर शिवसेनेचे हे तरुण नेतृत्व सक्रिय राजकारणापासून दूर असल्याचे चित्र निर्माण झाले होते. हीच संधी भाजपने उठविली आहे. दिवाळीत राजकीय फटाके फोडण्याची तयारी भाजपने केली असून या अभ्यासू तरुण नेत्याला भाजप आपल्या गोटात सामील करून घेणार आहे. याची मोर्चेबांधणी सुरू झाली असून चर्चा अंतिम टप्प्यात पोचली आहे. शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करून हा युवा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर शहरात सुरू होती. या घटनेमुळे शिवसेनेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mayor of shivsena in path of BJP in ratnagiri political changes