आमदार वैभव नाईक यांनी यंत्राने लावण करत दिला `हा` संदेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

कुडाळ कृषी विभाग व रांगणा ग्लोबल शेतकरी गट यांच्या नियोजनातून बाजीराव झेंडे यांच्या शेतावर यांत्रिकीकरणाद्वारे भात लावणीचा प्रारंभ सोमवारी (ता. 29) आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

कुडाळ ( सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात 50 टक्केपेक्षा जास्त शेतीचे यांत्रिकीकरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी केले. 

कुडाळ कृषी विभाग व रांगणा ग्लोबल शेतकरी गट यांच्या नियोजनातून बाजीराव झेंडे यांच्या शेतावर यांत्रिकीकरणाद्वारे भात लावणीचा प्रारंभ सोमवारी (ता. 29) आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार नाईक यांनी थेट शेतात उतरत मशीनद्वारे भात लावण केली. 

श्री. नाईक म्हणाले, ""सध्या शेतीसाठी माणसे मिळत नाहीत. त्यामुळे अनेकांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. पुन्हा या सर्वांना शेतीकडे वळविण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजना सरकारने आणली. माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नांतून चांदा ते बांदा योजनेतून शेतकरी गटांना कृषी अवजारांचे वाटप केले. चांदा ते बांदा योजनेतील जे प्रस्ताव मंजूर आहेत त्यासाठी सिंधू-रत्न योजनेतून निधी देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तालुक्‍यात खताची टंचाई होती. त्यासाठी खताचा पुरवठा करण्यात आला आहे. भात खरेदीसाठी गतवर्षी 2200 रुपये दर देण्यात आला. यावर्षी त्यात 60 रूपयांची वाढ झाली आहे. सध्या जिल्हयात काही प्रमाणात शेती यांत्रिकीकरणाद्वारे केली जाते. येत्या काळात हे प्रमाण 50 टक्केपेक्षा जास्त करायचे आहे.'' 

हिर्लोक गावात 50 एकर क्षेत्रात यांत्रिकीकरणाद्वारे भात लावणी करण्याचे येथील कृषी विभागाने नियोजन आहे. तालुका कृषी विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आमदार नाईक यांनी कृषी अधिकारी रमाकांत कांबळी यांचा सत्कार केला. जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब, पंचायत समिती सभापती नूतन आईर, उपसभापती जयभारत पालव, हिर्लोक सरपंच कन्याश्री मेस्त्री, उपसरपंच नरेंद्र राणे, रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर, येथील कृषी अधिकारी रमाकांत कांबळी, मंडळ कृषी अधिकारी प्रवीण कोळी, अमोल करंदीकर, रांगणा ग्लोबल शेतकरी गटाचे विनोद सावंत, श्री. झेंडे, अनिल परब, बाळा सावंत, तुषार परब उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mechanization Of Farming In Sindhudurg Message By MLA Vaibhav Naik