वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षीपासून ः सामंत

नंदकुमार आयरे
Saturday, 17 October 2020

पालकमंत्री सामंत म्हणाले, ""गेल्या अनेक वर्षांपासून असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची, मागणी पूर्ण झाली आहे.

सिंधुदुर्गनगरी -  जिल्ह्यात नव्याने मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षी प्रवेश सुरू व्हावेत, यादृष्टीने प्रयत्न आहेत. येत्या आठ दिवसांत आवश्‍यक कर्मचारी नियुक्तीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

झूम ऍपच्या माध्यमातून पालकमंत्री सामंत यांनी आज जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून जिल्ह्यात रखडलेल्या अनेक प्रकल्पांची कामे मार्गी लावल्याचे सांगून पालकमंत्री सामंत म्हणाले, ""गेल्या अनेक वर्षांपासून असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची, मागणी पूर्ण झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा दौऱ्यावेळीच सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्याल सुरू करण्याचे संकेत दिले होते. ते पूर्ण करत सध्याच्या कोरोनाच्या काळातही शासकीय वैद्यकीय महाविद्याल मंजूर करण्याचे काम राज्य शासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली केले आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या पद निर्मितीचा प्रस्तावही तयार करण्यात आला असून त्यास लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल असा मला विश्वास आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा नियोजन समितीचा निधी कमी झाला आहे. त्यावेळी मी जिल्हावासीयांना शब्द दिला होता की त्यापेक्षा जास्त निधी मी जिल्ह्यात आणेन. त्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. त्याचाच भाग म्हणून आंगणेवाडीच्या नळपाणी योजनेसाठी 22 कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. भालचंद्र महाराज मठासाठी 50 लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सावंतवाडी नगरपालिकेस सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. कणकवली, कुडाळ, मालवण नगरपालिकांनाही 5 ते 6 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोविड - 19 तपासणी प्रयोगशाळा सुरू झाली आहे. ऑक्‍सिजन प्लांट सुरू झाला आहे. जिल्ह्यात रखडलेली अनेक कामे मार्गी लागली आहेत. त्यामध्ये कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे स्मारक, मच्छिंद्र कांबळी यांचे स्मारक, चिपी विमानतळाचे प्रश्न, विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सुमारे 40 कोटींचा निधी देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व विश्रामगृहांचे नूतनीकरण करण्यासाठी 20 कोटींचा निधी देण्यात आला आहे.'' 

आडाळी आयुषचा प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाणार नाही 
पालकमंत्री सामंत म्हणाले, ""दोडामार्ग तालुक्‍यातील आडाळी येथे होणारा आयुष्य मंत्रालयाचा प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाणार नाही. यासंबंधी केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाणार असल्याचे वृत्त हे खोटे आहे. उमेदच्या कर्मचाऱ्यांना तत्काळ नियुक्ती देण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदचे खासगीकरण होणार नाही.'' 

टीका करण्यापेक्षा एकत्र विकास करुया 
जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असून जर फक्त टीकेला उत्तरच देत बसलो तर काम कधी करणार असे सांगून पालकमंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले, ""विकासकामांसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया. टीका करण्यापेक्षा काम करुया. मनात आणले तर विकासकामे झपाट्याने करता येतात हे मी घेतलेल्या निर्णयातून दिसून येते. जिल्ह्यातील सर्व प्रश्‍न सोडवण्याचा आणि कामे मार्गी लावण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि यापुढेही याच भूमिकेतून काम करत राहणार आहे.'' 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical college at Sindhudurg from next year