कोरोनाचा कहर, सिंधुदुर्गात बेडचा तुटवडा

विनोद दळवी 
Saturday, 19 September 2020

परिणामी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त सध्या मोठ्या संख्येने घरीच उपचार घेत आहेत. 

ओरोस (सिंधुदुर्ग) -सिंधुुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या अडीच हजाराच्या घरात पोहोचली आहे. यातील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 202 झाली आहे. कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेली कोविड हॉस्पिटल व खासगी दवाखाने मिळून 840 एवढी बेड संख्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे रूग्णांसाठी बेडची कमतरता प्रकर्षाने भासत आहे. परिणामी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त सध्या मोठ्या संख्येने घरीच उपचार घेत आहेत. 

सुविधा विस्तारल्या पण... 
जिल्ह्यात सुरुवातीला कोरोना रुग्ण व संशयित यांच्यावर सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत होते; मात्र रुग्ण व संशयित संख्या वाढू लागल्यावर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल म्हणून जाहिर करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात 10 कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आली. कोविड हेल्थ सेंटर उभारण्यात आली. ही सेंटर तालुक्‍याच्या ठिकाणी, उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय येथे सुरु करण्यात आली. या ठिकाणी कोरोना उपचारासाठी बेड उभारण्यात आले. त्यानंतर त्या-त्या तालुक्‍यातील रुग्णांवर तेथील कोविड सेंटर किंवा कोविड हेल्थ सेंटर येथे उपचार सुरु करण्यात आले. 

ऑक्‍सीजनचीही कमतरता 
कोरोना उपचारासाठी जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. रुग्णांना ऑक्‍सीजन कमी पडत होता. कोल्हापूर जिल्ह्याने ऑक्‍सीजन देण्यास नकार दिल्याने सध्या गोवा राज्यातून ऑक्‍सीजन आणला जात आहे. जिल्ह्याचा स्वतःचा ऑक्‍सीजन प्लांट उभारण्यासाठी 72 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. कोरोना येण्यापूर्वी जिल्ह्यात 7 व्हेंन्टीलेटर होते. ती संख्या आता 56 झाली आहे; मात्र कोरोना रुग्ण उपचारासाठी उभारण्यात आलेली बेड संख्या जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्ण पाहता कमी पडत आहे. जिल्ह्यात 840 बेड आहेत. सध्या उपचार घेणारे रुग्ण एक हजार 202 आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणाच सध्या सलाईनवर आली आहे. 

जिल्ह्यात कोरोनासाठी 20 आय. सी. यू. बेड उभारले आहेत. गरज पडली तर यात वाढ करण्यात येते. पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेजला 100 बेड घेण्यात आले आहेत; परंतु त्याचा सध्या वापर होत नाही. 
- डॉ. शाम पाटील, अधिकारी, जिल्हा रुग्णालय 

जिल्ह्यातील बेड व्यवस्था 
*जिल्हा रुग्णालय-225 
*वैभववाडी-150 
*वेंगुर्ले-150 
*कुडाळ-90 
*मालवण-45 
*कणकवली-45 
*सावंतवाडी-45 
*देवगड-45 
*दोडामार्ग-45 
एकूण-840 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: medical facilities low in sindhudurg district hospital