
डॉ. अनिशा दळवी यांनी संबंधित शिक्षक मुख्यालयात राहत नसल्याचा ठराव ग्रामसभेचा आणून दिल्यास काय कारवाई करणार? असा प्रश्न केला असता प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यानी त्यांना सक्तीने मुख्यालय ठिकाणी राहण्यास भाग पाडू, असे सांगितले.
ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शिक्षक मुख्यालय ठिकाणी राहत नाहीत. तरीही त्यांनी ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार मुख्यालय ठिकाणी राहत असल्याचा ठराव आणून दिला आहे. ही बाब आज झालेल्या जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या मासिक सभेत उघड झाली आहे. यावेळी सदस्या डॉ. अनिशा दळवी यांनी संबंधित शिक्षक मुख्यालयात राहत नसल्याचा ठराव ग्रामसभेचा आणून दिल्यास काय कारवाई करणार? असा प्रश्न केला असता प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यानी त्यांना सक्तीने मुख्यालय ठिकाणी राहण्यास भाग पाडू, असे सांगितले.
सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या मासिक सभेला शिक्षणाधिकारी आंबोकर, सदस्य सरोज परब, डॉ अनिशा दळवी, सुधीर नकाशे, सुनील म्हापणकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नकाशे यानी भारतीय फुटबॉल संघात निवड झाल्याबद्दल वैभववाडी येथील शुभम पवार याचा अभिनंदन ठराव मांडला. शिष्यवृत्ती सभेत यश मिळविलेल्या मुलांचा अभिनंदन ठराव घेण्यात आला.
यावेळी सदस्या डॉ. दळवी यानी प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत शासनाने धोरण निश्चित केले का? असा प्रश्न केला. यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी, अद्याप शासनाच्या याबाबत सूचना नाहीत; परंतु गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून कोरोना नसलेल्या गावांची माहिती मागविली आहे. त्या गावात शाळा सुरू करता येतील का? याची चाचपणी सुरू आहे; परंतु यासाठी त्याच गावांत, पंचक्रोशीत राहणारे शिक्षक आवश्यक आहेत. तालुक्याच्या ठिकाणावरुन शिक्षक येवून उपयोग नाही, असे सांगितले.
यावर सुधीर नकाशे यांनी आपले प्राथमिक शिक्षक मुख्यालयी का राहत नाहीत? त्यांना ते बंधन नाही का?, असा प्रश्न केला. त्यावर आंबोकर यांनी शिक्षक मुख्यालयी राहावेत, असे ग्रामविकास विभागाचे आदेश आहेत. त्याप्रमाणे सर्व शिक्षकांनी मुख्यालयात राहत असल्याच्या ग्रामसभेचा ठराव प्रशासनाला दिला आहे, असे सांगितले. यावर अनिशा दळवी यांनी हे शिक्षक मुख्यालयात राहत नसल्याचा ठराव आणून दिला तर कोणती कारवाई करणार ? असा प्रश्न केला. सक्तीने त्यांना मुख्यालयात राहायला लावू, असे आंबोकर यांनी सांगितले.
सदस्यांच्या सूचना नसल्याचा आरोप
सौ. परब यांनी आपण मागच्या सभेत तीन सूचना मांडल्या होत्या. या तिन्ही सूचना इतिवृत्तात घेण्यात आलेल्या नाहीत. महीना भरात त्याचे लेखी उत्तर नाही. बाकीच्या सदस्यांच्या सूचना येतात. मग माझ्याच का नाहीत ? आमच्या सुचना येत नसतील तर मी गप्प बसते. कशाला सभेला यायचे ? अशाप्रकारे नाराजी व्यक्त केली.
सभेतील ठळक चर्चा
- माध्यमिक शिक्षणाधिकारी सलग तिसऱ्या सभेला अनुपस्थित
- सभागृहाने मेडिकल प्रमाणपत्र सादर करण्यास सांगुनही पालन नाही
- शाळा दुरुस्तीच्या कामांना अद्याप वेग नाही
- समग्र शिक्षा अभियान अंतर्गत 129 कामे मार्चपूर्वी पूर्ण करणार
- बांधकाम किंवा अन्य योजनेला निधी प्राप्त नाही
- जिल्ह्यात पदवीधर, उपशिक्षक मिळून 422 पदे रिक्त
- रिक्त पदांची टक्केवारी 14.48 एवढी
संपादन - राहुल पाटील